Chhagan Bhujbal on Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढत महायुतीसरकारमध्ये पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठी लवकर उपमुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून केला जात आहे. आज पक्षाचे नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटेकर आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलत असताना सुनेत्रा पवार यांच्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) विधिमंडळ गटनेता ठरविण्यासाठी उद्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठीकत विधिमंडळ पक्षनेते म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री होऊ शकतात आणि त्यांचा शपथविधी शनिवारी (३१ जानेवारी) होणार असल्याची शक्यता छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

छगन भुजबळ काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अजित पवारांचे निधन ज्यापद्धतीने झाले, ते अजूनही कुणाच्या डोक्यातून गेलेले नाही. यामुळे आमची झोप उडाली. पण “शो मस्ट गो ऑन..”, याप्रमाणे कुणाला तरी जबाबदारी द्यावी लागेल. पक्ष आणि सरकार कुणाला तरी चालवावे लागेल. यासाठी आम्ही उद्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यात विधिमंडळ पक्षनेते पद देण्याबाबतचा निर्णय होईल.

सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद दिले जावे, अशी चर्चा मी टीव्हीवर ऐकतो आहे. त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाबाबत म्हणाले…

अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत काही बैठका झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे. याबाबत भुजबळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, या संदर्भात मला अधिक माहिती नाही. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आम्ही लक्ष देत आहोत. उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त झाली असून ती ताबडतोब भरण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत.