२८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला असा दिवस ठरला ज्या दिवसाच्या आठवणी आजही आल्या की लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या दिवशी विमान अपघातात निधन झालं. २८ जानेवारीला घडलेली ही घटना महाराष्ट्रावर आघात करणारी ठरली यात शंकाच नाही. २९ जानेवारीला बारामती या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही प्रश्न विचारले आहेत. दरम्यान त्यांनी अजित पवारांबाबत एक महत्त्वाची बाब सांगितली.
अजित पवारांच्या घड्याळातली वेळ १५ मिनिटं पुढे असायची
अजित पवार जे घड्याळ घालायचे त्यातली वेळ ही कायम १५ मिनिटं पुढे ठेवायचे. अजित पवारांचं जे घड्याळ जळालेल्या अवस्थेत सापडलं त्यात ९ वाजले होते. ते घड्याळ बंद पडलं होतं. ते पाहून मला समजलं की अजितदादा आपल्यात नाहीत. ज्यांनी विमानाची अवस्था पाहिली त्या सगळ्यांना अश्रू अनावर आले. अजितदादा आपल्यात नाहीत, ते नसले तरीही विचारांनी ते आपल्या बरोबर आहेत असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हे म्हटलं आहे.
सगळी माहिती अजित पवारांच्या प्रेमापोटी मिळवली आहे-रोहित पवार
अजित पवारांचा स्वेटर, चप्पल, रोज जे घड्याळ घालायचे ते घड्याळ. सगळं असायचंच. हे सगळं तिथे होतं. मला लोकांना हे सांगायचं आहे की जी घटना घडली ती घडली आहे. आज अजितदादा आपल्यात नसले तरीही विचारांननी ते आपल्यासह आहेत. अजित पवारांच्या प्रेमापोटी ही सगळी माहिती आम्ही मिळवली आहे आणि तुम्हाला सांगत आहोत असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
२८ जानेवारीच्या त्या दिवशी काय घडलं? रोहित पवार काय म्हणाले?
अजितदादा हे ७ वाजून ५० मिनिटांनी एअरपोर्टवर आले. दादांचे विमान ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ केलं. ८.२२ ला ते विमान हे लोणावळा या ठिकाणी असेल. ८ वाजून ४३ मिनिटं ते ८ वाजून ४५ मिनिटं या दरम्यान ती दुर्दैवी घटना घडली. ९ वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि सकाळी ९.४५ च्या दरम्यानदादांचं निधन झाल्याची बातमी आली.
