Baramati Zilla Parishad Panchayat Samiti Election Results : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बारामती तालुक्यातील कलही हाती आले. मतमोजणीच्या दिवशी बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची खोल छाया दिसून येत होती. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना यश मिळाले असले तरीही या विजयावर आनंदाचा जल्लोष नव्हता. अजित पवार यांच्या आठवणींनी पक्षातील सगळ्या उमेदवारांची मने गहिवरलेली होती. मतमोजणी केंद्रातून विजयी उमेदवार बाहेर पडत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह दिसून येत नव्हता.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये मिळालेले यश आमचे नसून अजितदादांचे आहे, असे पाणावलेल्या डोळ्यांनी उमेदवार सांगत होते. बारामती तालुका हा अजित पवार यांचा राजकीय गड मानला जातो. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जडण-घडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच आजचा विजय साजरा करण्याऐवजी अनेकांनी तो शांतपणे स्वीकारला. मतमोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्येही एका प्रकारची स्तब्धता होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊन नये म्हणून मतमोजणी केंद्रावर तैनात असलेले पोलिसही शांतपणे बसून होते.

आणखी वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला भोपळा; भाजपा-शिंदे गटाला मोठं यश, ठाकरेंना किती जागा?

बारामतीत जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी शनिवारी (७ फेब्रुवारी) मतदान पार पडले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे या निवडणुकीवर दुःखाचे सावट पसरले होते. शनिवारी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही त्याचा प्रभाव दिसून आला. बारामतीत यंदाच्या निवडणुकीत केवळ ५४ टक्के मतदान नोंदवले गेले. सोमवारी मतमोजणीनंतर जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आले. त्याशिवाय पंचायत समितीच्या १२ गणांमध्येही राष्ट्रवादीलाच विजय मिळाला.

हेही वाचा : भाजपाचा उमेदवार अवघ्या दोन मतांनी पराभूत; लातूरमध्ये जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

जिल्हा परिषद सुपा गटातून अजित पवार यांच्या पक्षाच्या पल्लवी प्रमोद खेत्रे यांनी विजय मिळवला. निकालानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदापेक्षा अश्रू अधिक होते. बारामती पंचायत समिती सुपा गणातून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत उमेदवार उज्वला पोपट खैरे, कार्हाटी गणातून शामल सुनील वाबळे आणि गुणवडी गणातून शुभांगी सुनील आगवणे यांनी विजय मिळवला, तर जिल्हा परिषद गुणवडी गटातून शुभांगी कचेर शिंदे यांनाही मतदारांनी कौल दिला. शिर्सुफळ गणातून अनिकेत प्रभाकर गावडे हे विजयी झाले. पणदरे गटातील मतदारांनी मंगेश जगताप यांच्याच पारड्यात मते टाकली. आम्हाला आजचा विजय साजरा करायचा नसून अजितदादांच्या आठवणी जपायच्या असल्याच्या भावना सर्वच उमेदवारांनी व्यक्त केल्या. विजयानंतर त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विजयी उमेदवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेटही घेतली.