Ajit Pawar On Pune BJP : राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेबाबत बोलताना भाजपावर टीका केली होती. त्यांच्या या टिकेनंतर भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यातच अजित पवारांनी पुणे महापालिकेच्या जाहीरनाम्यात मोफत पीएमपी आणि मेट्रो सेवा देण्याची घोषणा केली. यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवारांनी युती धर्म न पाळल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीमधील संघर्षाची चांगलीच चर्चा झाली. या घडामोडींवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पुण्यातील भाजपा आणि राष्ट्रवादीतील वादाबाबत बोलताना अजित पवारांनी सूचक इशारा देताना म्हटलं की, ‘आपण गरज पडल्यास दिल्लीत जाऊन चर्चा करू.’ भाजपा नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केल्यामुळे पुण्यातील भाजपा आणि राष्ट्रवादीतील वाद दिल्लीत जाणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ते झी २४ तास च्या मुलाखतीत बोलत होते.
अजित पवार काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात बोलताना म्हणाले की, अजित पवारांचा संयम ढळला, या प्रश्नांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तसं मत असून शकतं. पण आता महापालिकेचं मतदान पार पडल्यानंतर मी त्यांच्याशी बोलेन.”
अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही त्याबाबत बोलू. तो आमच्या दोघातला प्रश्न आहे. आम्ही सरकारमध्ये जात असताना आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच गेलेलो आहोत. आम्ही खालच्या नेत्यांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे ज्यांच्याशी चर्चा करून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो, केंद्रात आणि राज्यात. त्यांच्याशी मी चर्चा करेन, म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील प्रमुख, यांच्याशी आम्ही चर्चा करू.”
“देवेंद्र फडणवीसांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी जर तुमच्याशी चर्चा करून या प्रक्रियेमध्ये आलेलो असेल तर, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांशी देखील (दिल्लीत) जाऊन चर्चा करावी लागेल. जर तसं वाटलं तर हा विषय तिथपर्यंत (दिल्लीपर्यंत) जाईल”, असं मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.
“अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही…”; फडणवीसांनी बोलून दाखवली खंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी युतीचा धर्म पाळला, पण अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. अजित पवारांनी जी वक्तव्यं केली ती वक्तव्यं मला पटलेली नाहीत. पण मी त्याचा प्रतिवाद केलेला नाही. या निवडणुकीत मी पहिल्या दिवशी पासून ठरवलं होतं की मित्र पक्षांवर टीका करणार नाही. ती मी केली नाही. दुसरं ठरवलं होतं की मी कुठल्याही नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईत उत्तरं मी देतो. विकासावर बोललं नाही तर लोकांना हे वाटू शकतं की आम्ही दुर्बल आहोत. पुणे-पिंपरीत मी युतीचा धर्म पाळला. अजित पवारांनी युती धर्म नाही पाळला.”
‘अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप’ : रवींद्र चव्हाण
उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपासोबत कशापद्धतीने जोडले गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीत सांगायचो की थोडा विचार करावा. पण आता पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत आहे’, असं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं होतं.
चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला होता इशारा
“मी आता असं म्हणेन की,‘ये घरला जायचयं का?’असं म्हणणाऱ्यांना मी सांगतो की, मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच आहेत.त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका”, असा अप्रत्यक्ष इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला होता.
