भाजपाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या चर्चेत आहेत. यानिमित्ताने भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व अधोरेखित केलं असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं असून देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास ब्राम्हण महासंघाने व्यक्त केला आहे. तसंच, भाजपा नक्कीच फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करेल, अशी आशाही व्यक्त केली आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं आहे –

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आपण स्थान दिलंत त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस कुशल राजकारणी असून, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध केलं आहे. ते भाजपाचं भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याने धक्का नक्कीच बसला होता. पण आता घेतलेल्या निर्णयाने थोडासा दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं”.

“जेव्हा तुम्ही श्रेष्ठींसमोर आव्हान उभं करता…”, भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

“पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असा शब्दही त्यांनी दिला आहे.

“अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे,” असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bhartiya brahman mahasangh bjp devendra fadnavis pune lok sabha constituency sgy
First published on: 19-08-2022 at 12:55 IST