लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असताना अक्कलकोट तालुक्यात भाजप व काँग्रेसमध्ये संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाने भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना अवैध धंद्यांच्या मुद्यावर दिलेला धमकीवजा इशारा आणि त्यास आमदार कल्याणशेट्टी यांनी जशास तसे पद्धतीने दिलेले प्रत्युत्तर यामुळे अक्कलकोटचे राजकारण आतापासूनच तापू लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर अक्कलकोटमध्ये आयोजित सभेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करीत थेट आव्हान दिले. एवढेच नव्हे तर तालुक्यात काँग्रेसशी संबंधित मंडळींचा अवैध धंद्यांशी काहीही संबंध नसताना भाजपच्या हस्तकांचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यावर गुन्हेगारी पोसली जात आहे. आमदार कल्याणशेट्टी यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी जाब विचारावा. या प्रश्नावर एक तर आपण तरी राहू वा कल्याणशेट्टी तरी राहतील, असा धमकीवजा इशाराही म्हेत्रे यांनी दिला.

आणखी वाचा-सोलापूर : उजनी पर्यटन विकास केंद्र उभारण्याच्या पुन्हा हालचाली, पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीत आराखडा सादर

तथापि, म्हेत्रे यांच्या या धमकीवजा इशाऱ्यावर भाष्य करताना आमदार कल्याणशेट्टी यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. अवैध धंदे बंद झाल्याने काँग्रेसवाल्यांच्या पोटात गोळा उठला आहे. अवैध धंदे ही काँग्रेसवाल्यांची संस्कृती आहे. त्यांनी कितीही धमक्या दिल्या तरी आपण त्यास भीक घालत नाही, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले. शंकर म्हेत्रे हे अक्कलकोटचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे बंधू आहेत.