मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागांत पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली साठेबाजी केली जात आहे, त्यामुळे अन्न नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभागाचे संयुक्त पथक राज्यभर निरीक्षण, देखरेख करणार आहे. साठेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांना इंधन मिळत नसल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करण्यात आला. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हानिहाय पेट्रोल, डिझेल, सीएनजी पुरवठ्याचे आकडे सादर केले.
अकोल्यामध्ये सर्वाधिक इंधन विक्री
अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे, जळगाव, नांदेड, धाराशिव, नाशिक, परभणी, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० ते १५४ टक्क्यांपर्यंत डिझेल विक्रीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेल पुरवठा सुरळीत असतानाही तुटवडा जाणवत आहे. साठा करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, साठेबाजांना आळा घालण्यासाठी अन्न नागरी पुरवठा आणि गृह विभागाचे संयुक्त पथक सर्वसाधारण तपासणी मोहीम राबविणार आहे. यामध्ये सापडणाऱ्या साठेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून इंधन टंचाईची कबुली
मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही काही जिल्ह्यांमध्ये डिझेल विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये सरासरीपेक्षा १५४ टक्के वाढ झाली असून, छत्रपती संभाजी नगर, बीड, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, हिंगोली जिल्ह्यांमध्ये नियमित वापरापेक्षा ७० टक्क्यांपर्यत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले.
