अकोला : बहिणीचे लग्न जुळले. लग्नाच्या तयारीची जबाबदारी भावावर. सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, नियतीचा काही वेगळेच मान्य होते. बहिणीच्या लग्नपत्रिका वाटण्याचा प्रवास त्याच्यासाठी अखेरचा ठरला. चारचाकीने दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात घडला. यामध्ये भावाचा दुर्दैवी अंत झाला. शिवम जानराव आगळे (२४) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे आगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरातील गुरुकुल कोठारी वाटिका एक येथील रहिवासी आगळे कुटुंबात मुलीचे लग्न जुळल्याने आनंदी वातावरण होते. कुटुंबातील सर्व सदस्य लग्नाच्या तयारीत गुंतले होते. बहिणीचे लग्न ५ जूनला असल्याने शिवमची तयारीसाठी लगबग सुरू होती. तो बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटत होता. त्यानंतर तो दुचाकीने घरी परत येत असताना उड्डाणपुलावर भरधाव चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेमुळे दुचाकी पुलावरील दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात शिवम हा रस्त्यावर पडला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. शिवमच्या दुचाकीला धडक दिलेल्या वाहनाने आणखी इतरही वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उड्डाणपूल ठरतोय अपघातस्थळ; अनेकांचा गेला जीव

शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने बसस्थानकासमोरील मुख्य मार्गावर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. या उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत झाली असली तरी भरधाव वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा पूल वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या पुलावर आतापर्यंत असंख्य अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला. शहरातील उड्डाणपुल हे अपघात प्रवणस्थळ झाले. या पुलावर ‘हिट अँड रन’चे प्रकारही घडले आहेत. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून भरधाव वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. उड्डाणपुलावरून सातत्याने अपघात होत असल्याने त्या पुलामध्ये देखील काही तांत्रिक दोष आहेत का? या दृष्टीने देखील तपास करण्याची आवश्यकता दिसून येते. उड्डाणपुलावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्याची मागणी होत आहे.