अकोला: तालुक्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे टिटवी (३०३.३२ दलघफु ), देवहांडी शिरपुंजे (९४.८० दलघफू) आणि कोथळे (१८२ दलघफु) हे तीन लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागले तर भंडारदरा धरण ५० टक्के भरले आहे. मुळा नदीला मध्यम स्वरूपाचा पूर आल्याने मुळा धरण ३० टक्के भरले आहे. जिल्ह्याच्या ‘चेरापुंजित’ चोवीस तासात ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. घाटघरला ३२१ मिमी (सुमारे १३ इंच) तर रतनवाडीला ३०२ मिमी (१२ इंच) पाऊस कोसळला. सततच्या मुसळधार पावसामुळे कळसूबाई- हरिश्चंद्रगड परिसर गारठून गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दोन दिवसांपासून मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटात अतिवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे डोंगर कड्यावरून कोसळणाऱ्या ओढ्यांनी विक्राळ रूप धारण केले आहे. हरिश्चंद्रगड पर्वत रांगेतील पावसामुळे मुळा नदीला मध्यम स्वरूपाचा पूर आला आहे. आज, मंगळवारी सकाळी कोतुळ जवळ मुळा नदीचा विसर्ग १३ हजार ८३६ क्युसेक होता. तर दुपारी ३ वा. वाढून ३७ हजार ८७५ क्युसेक झाला होता.

मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ सुरू आहे. दिवसभराचे बारा तासात धरणात ४६७ दलघफू पाण्याची आवक झाली. सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा ७ हजार ६९३ दलघफु (२९.५८ टक्के) झाला होता. लहित खुर्द येथील मुळा नदीवरील पुल आज पाण्याखाली गेला. त्यामुळे लहित खुर्द व लहित बुद्रुक या गावांचा परस्परांशी असणारा संपर्क तुटला. मुळा नदीच्या पुराचा फटका कोतुळ येथील प्राचीन कोटुळेश्वर महादेव मंदिराला बसला. मंदिर सुमारे पाच फूट पाण्याखाली गेले आहे.

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे कोतुळ, ब्राम्हणवाडा परिसरात अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, तारा तुटल्या. त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. काल, सोमवारच्या अतिवृष्टीमुळे आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात भंडारदरा धरणात एक टीएमसीपेक्षा जास्त पाण्याची आवक झाली. सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ६०४ दलघफू (५०.७६ टक्के) झाला होता.

प्रवरा खोऱ्यातील वाकी पाठोपाठ आज टिटवी तलाव भरून वाहू लागला. हे दोन्ही तलाव भरल्यामुळे निळवंडेतील पाण्याची आवक वाढली आहे. सायंकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा २ हजार ११६ दलघफू (२५.३८ टक्के) झाला होता. आजचा पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे: भंडारदरा २४०, निळवंडे १४५, आढळा धरण ७०, अकोले ९३, रतनवाडी ३०२, घाटघर ३२१ पांजरे २७०, वाकी १७३, अंबित २०२, विहीर १९७, खडकी ११० व कोतुळ ५८.

भात खचरे तुडुंब

पाणलोटात सातत कोसळणाऱ्या पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. जनावरे चरायला नेता येत नसून ती घरातच बांधून ठेवावी लागत आहे. सर्व परिसर गारठून गेला असून उबेसाठी लोकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. भात खचरे तुडुंब भरली आहेत. अती पावसामुळे भात रोप सडली किंवा वाहून गेली असून मोठे नुकसान झाले आहे. पाऊस कमी झाल्यानंतरच नुकसानीचे स्वरूप स्पष्ट होईल.