अकोले: पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ गावांचा समावेश असून ही सर्व गावे अकोले तालुक्यातील आहेत. पश्चिम घाटातील सुमारे ५६८२५.७ चौ. किमी. क्षेत्राला पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने सातवी मसुदा अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. राज्यातील सात जिल्ह्यातील २ हजार ५१५ गावांमधील १७ हजार ३४० हेक्टर क्षेत्राचा यात समावेश आहे. यातील ४८ गावे अकोले तालुक्यातील आहेत.
या मसुद्यावर जनतेकडून ६० दिवसांचे मुदतीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मसुदा अधिसूचनेत समावेश असलेली गावे पुढीलप्रमाणे: अबितखिंड, आंबेवंगण, अंभोळ, अंबित, बारी, बिताका, ब्राम्हणवाडा, धामणवण, येसारठाव, गारवाडी, घाटघर, गोडेवाडी, जहागिरदारवाडी, केळीकोतुळ, केळीओतुर, खेतेवाडी, कोळटेंभे, कोथळे, कोतुळ, कुमशेत, लव्हाळी कोतुळ, लव्हाळी ओतुर, महादेववाडी, मुरशेत, मुथकेल, पाचनई, पैठण, पळसुंदे पांजरे. फोपसंडी, रतनवाडी, साम्रद, सातेवाडी, शेणीत खुर्द, शेलद, शेणित, शिळवंडी, शिंदे, शिंगणवाडी, शिरपुंजे खुर्द, शिरपुंजे बुद्रुक, शिसवद, सोमलवाडी, तळे, उडदावणे, उंबरेवाडी, विहीर व वारंघुशी.
पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात अनेक प्रकल्प तसेच उपक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे. नवीन खाणकाम, दगडखाणी आणि वाळू उत्खनास पूर्ण बंदी असेल. नवीन औष्णिक वीजप्रकल्प सुरू करता येणार नाहीत. प्रदूषणकारी उद्योगांना परवानगी नसेल. मोठे बांधकाम प्रकल्प निर्माण करता येणार नाहीत. मात्र विद्यमान निवासी घरांच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणावर कोणतेही निर्बंध नसतील. विद्यमान आरोग्य सेवा तसेच कायद्याप्रमाणे प्रस्तावित आरोग्य केंद्रे सुरू ठेवता येतील.
या अधिसूचनेमुळे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीच्या मालकीहक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्ते, पूल, पर्यटन प्रकल्प नियमांच्या अधीन असतील. पारंपरिक शेती, सेंद्रिय शेती, जलसंवर्धन, पर्यावरण पूरक हरित तंत्रज्ञानाचा वापरास पूर्ण अनुमती असेल. जैवविविधतेचे रक्षण व पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास करणे हा अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे. पश्चिमघाट हा जगातील महत्वाच्या जैवविविधता स्थळांपैकी एक आहे. पश्चिम घाटाचा काही भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील घोषित केलेली गावे जैवविधतेने समृद्ध आहेत. विशेषतः हरिश्चंद्रगड परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती आढळतात. जैवविविधता व वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या परिसरातील २५ गावांचे ३६१ चौ.किमी क्षेत्र कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हा भाग अहिल्यानगर जिल्ह्याचा जलसाठा आहे. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नद्या याच परिसरात उगम पावतात. जिल्ह्याचे कृषी अर्थकारण या नद्यांवरील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा या धरणावर अवलंबून आहे.
