अकोले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘महाराष्ट्राची शिवधारा’ या उपक्रमात अकोले तालुक्यातील अमृतेश्वर व हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर या दोन शिवमंदिराना स्थान मिळाले आहे. या दोन प्राचीन शिवमंदिरांची वेगळी वैशिष्ट्ये यातून सर्वदूर पोहचली आहेत. ‘महाराष्ट्राची शिवधारा’ हा मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातुन सुरू झालेले एक विशेष डिजिटल समाज माध्यमी उपक्रम आहे‌. राज्यात पाच ज्योतिर्लिंगांसह अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत. धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाबरोबरच अनेक मंदिरांचे स्थापत्यही देखणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमामुळे अकोल्यातील मंदिरांचे वेगळे पैलू समोर आले आहेत.

शिवतीर्थांचे सांस्कृतिक स्थापत्यवैभव जनतेसमोर विशेषत: नवीन पिढीसमोर आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे‌. ‘जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक ऐतिहासिक वारसा जपला जाईल’, हा या उपक्रमांचा विचार आहे. श्रावण महिन्यात या उपक्रमास सुरवात करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः त्यांच्या समाज माध्यमांवर (एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम) दररोज एका शिवमंदिराची माहिती देतात. यात त्या शिवमंदिरांचे वैशिष्ट्य सांगितलेले असते. तसेच या मंदिराचे सुंदर छायाचित्र असते. छायाचित्राच्या प्रारंभी ‘शिवस्तुती’ मधील एक श्लोक दिलेला असतो. या उपक्रमामध्ये आज पर्यंत पाच ज्योतिर्लिंगाबरोबरच राज्याच्या विविध भागातील अनेक अनोख्या व वैशिष्ठ्यपूर्ण शिवमंदिरांची माहिती समोर आणली गेली आहे.

अकोल्यातील हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानजवळील अमृतेश्वर या शिवमंदिरांची माहिती देण्यात आली. ‘हरिश्चंद्रगडावरील एका गुहेत,थंडगार पाण्याने वेढलेले, पाच फूट उंच शिवलिंग असलेले अहिल्यानगरमधील प्राचीन केदारेश्वर शिवमंदिर! असे, या मंदिराचे वर्णन करण्यात आले आहे. सोबत मंदिराचा विलोभनीय फोटो आहे.

हरिश्चंद्रगडावर काळया पाषाणातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असणारे हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याबरोबरच केदारेश्वर लेणे ही आहे. एका गुहेत मध्यभागी केदारेश्वराचे शिवलिंग असून त्या भोवती वर्षभर थंडगार पाणी असते. या शिवलिंगाचे भोवती चार दगडी खांब आहेत. त्यातील तीन खांब मोडले असून सध्या एकाच खांब सुस्थितीत आहे. गूढरम्य असे या ठिकाणचे वातावरण आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथील ‘अमृतेश्वर’ मंदिरालाही या उपक्रमात स्थान मिळाले आहे. ‘गाभाऱ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असलेले अहिल्यानगरमधील प्राचीन अमृतेश्वर शिवमंदिर या शब्दात या मंदिराचे वैशिष्ट सांगण्यात आले आहे. सोबत शिल्पसमृद्ध असणाऱ्या मंदिराचा छायाचित्र आहे.

रतनगडाच्या पायथ्याशी असणारे हे मंदिर अप्रतिम शिल्प सौंदर्याचा नमुना आहे. ११ व्या-१२ व्या शतकात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या मागे असणाऱ्या रतनगडावर प्रवरा नदी उगम पावते. या नदीवरील भंडारदरा धरण काठोकाठ भरले की त्याचे पाणी थेट रतनवाडीपर्यंत पोहचते. त्या शवेळी मंदिरातील गाभाराही पाण्याने भरून जातो. गाभाऱ्यातील पिंडीवर तीन साडेतीन फूट पाणी असते. सुमारे चार महिने ही पिंड पाण्यात असते.