अकोले: तालुक्याला समृद्ध वनसंपदेचे वरदान लाभले आहे. मात्र तालुक्यातील या वनसंपदेला जणू वणव्यांचा शाप मिळाला आहे. दरवर्षी तालुक्यातील जंगलाला लागणाऱ्या आगीत मोठ्या प्रमाणात वनांची राखरांगोळी होत असते. या वर्षीही तालुक्यातील वनक्षेत्रात मागील सहा महिन्यात वणवे लागण्याच्या १४७ लहानमोठ्या घटना घडल्या. यामध्ये सुमारे २०० हेक्टर वनक्षेत्राची राखरांगोळी झाली. बरोबरच पशुपक्षी, वन्यजीव, सरपटणारे प्राणी यांनाही या आगीचा फटका बसला. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी या आगी समाजकंटकांकडून लावल्या जात असल्याची चर्चा आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र अकोले तालुक्यात आहे. तालुक्यात वन विभागाची वन्यजीव भंडारदरा व राजूर, राजूर व अकोले प्रादेशिक, अकोले रोहयो, सामाजिक वनीकरण असे सहा विभाग आहेत. वणवे लागण्याच्या सर्वाधिक म्हणजे ७१ घटना अकोले प्रादेशिक वनपरिक्षेत्रात घडल्या. त्यामुळे एकूण ९३ हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटना वाशेरे घाट, ढग्या डोंगर, भागाड्या डोंगर, गर्दणी, मेहेंदुरी, अंबड, ढगेवाडी, पिसेवाडी, कळंब, लिंगदेव, ब्रम्हणवाडा, बेलापुर या परिसरात घडल्या. या भागात डोंगरांची रचना आग विझविण्याच्या दृष्टीने अडचणीची आहे. उंच व क्लिष्ट डोंगररचना, एकाचवेळी अनेक ठिकाणी आगी लागणे, यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना मर्यादा पडतात, असे सांगण्यात येते.

अकोले रोहयो विभागात २३ आणि राजूर २८ अश्या वणव्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे १८ हजार वनक्षेत्र वन्यजीव विभागाच्या अख्यतारीत आहे. वन्यजीव विभागात वणवे लागण्याच्या घटना तुलनेने कमी घडल्या. भंडारदरा विभागात १२ तर राजूर हरिश्चंद्रगड विभागात १३ ठिकाणी वणवे लागले. त्यात अनुक्रमे २० आणि २२ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. उपलब्ध माहितीनुसार तालुक्यात सहा महिन्यात एकूण १४७ ठिकाणी वणवे लागले व त्या मुळे १८९ हेक्टर वनक्षेत्राची राखरांगोळी झाली.

या क्षेत्रालगतच्या भागालाही त्याच्या झळा कमीअधिक प्रमाणात पोहचल्या. दरवर्षी जंगलाला आगी लावण्याच्या घटनांमुळे वनसंपदेची मोठ्या प्रमाणात हानी होते. येथील जैवविविधतेला आगीचा मोठा फटका बसतो. ससे, घोरपड, मोर, यासारखे पशु, पक्षी, सापांसारखे सरपटणारे प्राणी होरपळतात.

वणवे हा जैवविविधता सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोले तालुक्याला भेडसावणारा प्रश्न आहे. काही ठिकाणी या आगी निष्काळजी पणामुळे लागतात. मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून अनेक ठिकाणी डोंगराना आगी लावल्या जातात. राजुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी मवेशी येथील कार्यक्रमात बोलताना या संदर्भात एक उदाहरण दिले. सावरकुटे येथील एका डोंगरावरील वनक्षेत्रात त्यांच्या विभागाने चार जाळपट्टे घेतले होते. एकदिवस त्या डोंगरावरील एका पट्ट्यातील गवत जाळण्यात आले. तीन दिवसांनंतर दुसऱ्या पट्ट्यातील, नंतर तिसऱ्या, चौथ्या असे करत संपूर्ण डोंगरावरील वनक्षेत्र जाळण्यात आले.

आगी लावणारे समाजकंटक जसे आहेत. तसे वणवा लागल्यानंतर तो वीझवायला धावणारे ठीकठिकाणचे गावकरीही आहेत. अशा गावकऱ्यांमुळेच वने टिकून आहेत.