अकोले: प्रसिद्ध सांधनदरी, कळसूबाई शिखरासह कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील गड, किल्ले व अन्य पर्यटनस्थळांवर जाण्यास वन्यजीव विभागाने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना बंदी घातली आहे. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात अनेक गड किल्ले, कडे, धबधबे आहेत. पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेश येईपर्यंत ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
भंडारदरा वनपरिक्षेत्रातील सांधनदरी, कोकणकडा, कळसूबाई शिखर अलंगड, मदनगड, कुलंगड तसेच रिव्हर्स वॉटरफॉलसह इतर धोकादायक वॉटरफॉल तसेच हरिश्चंद्रगड वनपरिक्षेत्रातील हरिश्चंद्रगड, भैरवगड, हापट्याचा कडा या ठिकाणी जाण्यास वन्यजीव विभागाने बंदी घातली आहे. अकोले तालुक्याला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. या निसर्ग कोंदणात आहे कळसूबाई व रतनगडाच्या डोंगर रांगात विसावलेला भंडारदरा धरणाचा जलाशय. या जलाशयाच्या पश्चिम टोकाला असणारा घाटघरचा परिसर अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखला जातो.
पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलते. डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे, खळाळत वाहणारे ओढे नाले, धुक्यात हरवलेले घाटघर पर्यटकांना मोहात पाडत .पूर्वी पावसाळ्यात फक्त या परिसरातच पर्यटक रमायचे. मात्र आता साहसी पर्यटकांना या परिसरातील गड किल्ले, कोकणकडे साद घालू लागले आहेत. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर असणाऱ्या शिखर स्वामींनी कळसूबाई ( १६४६ मी.) सह अनेक पर्वत शिखरे, गडकिल्ले अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात आहेत.
निसर्ग सौंदर्याबरोबरच अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीचा वारसा लाभलेला हरिश्चंद्रगड, अमृतवाहिनी प्रवरा नदीचे उगमस्थान असणारा रतनगड, साम्रद गावाजवळ असणारी अनोखी सांधणदरी, अलंग, कुलंग, मदन या बेलाग दुर्ग त्रयींच्या वाटा काही पर्यटक भर पावसाळ्यात तुडवता. मात्र हा सर्व परिसर पावसाळ्यात धोकादायक बनतो. वाटा निसरड्या होतात. अनेक पर्वत शिखरे, दऱ्या, कोकणकड्याचा परिसर धुक्यात हरवून जात असतो. गत वर्षी खिरेश्वर मार्गे हरिश्चंद्रगडावर आलेले पर्यटक गडावरील दाट धुक्यात वाट हरवले. पावसात कुडकुडत त्यांना रात्र काढावी लागली. ते सहन न झाल्यामुळे एका पर्यटकाला आपला प्राण गमवावा लागला.
या परिसरात पावसाळ्यात अनेक धबधबे कोसळत असतात. धबधब्याखाली भिजणे, सेल्फी काढताना, रील्स तयार करताना परिस्थितीचे भान न ठेवणे धोकादायक ठरू शकते. पावसामुळे शेवाळ साठून खडक निसरडे झालेले असतात. रंधा धबधब्याजवळ दगडातून पाय घसरल्यामुळे धबधब्यातून पर्यटक वाहून गेल्याच्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
या परिसरात खूप पर्यटन स्थळे असल्यामुळे प्रशासन सर्वच ठिकाणी लक्ष ठेऊ शकत नाही. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे. या पर्यटकांकडून निसर्गात होणारा कचरा ही एक चिंतेचा विषय आहे. केवळ पावसाळ्यातच नाही तर अन्य काळात सुद्धा पर्यटकांवर काही निर्बंध घालण्याची गरज असल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.
