अकोले: केंद्र सरकारने शेतीमालाच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. त्याचे किसान सभेच्या वतीने स्वागत करतानाच वाढ केलेले भाव प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाले तरच या वाढीला अर्थ असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे.
नेहमीच अशाप्रकारचे भाव वाढ जाहीर होत असते. भाववाढीचे श्रेय घेतले जाते. प्रत्यक्षात मात्र बाजारात शेतकऱ्यांना असे वाढीव भाव मिळत नाहीत.गत वर्षी सोयाबीनच्या भावामध्ये वाढ करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षामध्ये मुदतीची अट लावून शेतकऱ्यांकडून सोयाबीनची आधारभावाने पुरेशी खरेदी झाली नाही. इतरही वेगवेगळ्या पिकांबाबत हाच अनुभव शेतकऱ्यांना येत असतो, असे ते म्हणाले.
तुरीचे आधारभाव जाहीर करायचे, तूर आधार भावामध्ये वाढ करायची, दुसरीकडे मात्र सरकारनेच तूर आयात करून तुरीचे भाव बाजारामध्ये पाडायचे, असा अनुभव येत असतो. आगामी काळात असे होऊ नये यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे.
सरकारने आधार भावाप्रमाणे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील असे ठोस उपाय करावेत. आयात निर्यातीची धोरणे त्यानुसार करावीत आणि आधार भावापेक्षा जास्त बाजारात बाजारभाव शेतकऱ्यांना मिळेल, अशी सरकारी खरेदी करावी. तरच या वाढीला काही अर्थ आहे. अन्यथा बोलाची कढी बोलाचा भात या पलीकडे आधार भावातील वाढीला शेतकऱ्याच्या लेखी अर्थ उरत नाही, असा टोला त्यांनी लगावला.