अकोले: निळवंडे गावच्या शिवारात सुरू असलेली अवैध दारूविक्री चक्क आमदारांनीच पकडून दिल्याची घटना घडली. यामुळे तालुक्यातील पोलिस आणि उत्पादन शुल्क यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.
एका कार्यक्रमानिमित्त आमदार डॉ. किरण लहामटे हे राजूर येथून निळवंडेमार्गे सांगवीकडे जात असताना, निळवंडे शिवारात एके ठिकाणी त्यांना संशयास्पद गर्दी दिसली. त्याची चौकशी करीत असतानाच आमदाराना पाहताच लोकांनी तेथून पळ काढला. या ठिकाणी एका घरात अवैधरित्या देशी दारूविक्री होत असल्याचे त्यांना दिसून आले. १०० देशी दारूच्या बाटल्या सापडल्या. विशेष म्हणजे ऑनलाइन पैसे घेण्यासाठी तेथे स्कॅनरही होता शिवाय घरच्या मागे एक कोपऱ्यात रिकाम्या दारू बाटल्यांचा खच पडलेला त्यांना आढळला. याचा अर्थ बऱ्याच दिवसांपासून तेथे अवैध दारू विक्री सुरू असावी.
आमदारांनी अधिक माहिती घेतली असता मेहेंदुरी येथील एक ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी अवैध दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी एक दुचाकी आढळली. त्या दुचाकीची हवा सोडण्यात आली. मात्र आमदार तेथून गेल्यानंतर ती दुचाकी तेथून गायब झाली. संबंधित दारू विक्रेत्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत.
या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून दारूविक्री सुरू होती. बीट हवालदाराचे अभय असल्याशिवाय दारू विक्रेता हा धंदा करू शकत नाही. त्यामुळे संबंधित बीट हवालदारावरही कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितले. पोलिस पाटीलही गावाकडे लक्ष ठेवीत नसेल तर तो तेथे कामावर राहता कामा नये असे ते म्हणाले. तसेच ज्यांच्या घरात ही विक्री सुरू होती त्या घरमालकाच्या सर्व शासकीय लाभ बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अकोल्यात अवैध दारूविक्री, गुटखाविक्री आणि इतर बेकायदेशीर धंदे पूर्णपणे बंद व्हावेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. तरुण पिढीचे भविष्य व्यसनामुळे उद्ध्वस्त होऊ नये, समाजात सुसंस्कृत आणि सक्षम युवक घडावेत हीच आपली भूमिका असल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितले.
गुटखा विक्रीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांनी आताच सावध व्हावे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींविरुद्ध तडीपारीसह आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
