अकोले: नगरपंचायतीचे भाजपचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आज, शुक्रवारी मंजूर करण्यात आला. भाजपच्या ८ बंडखोर नगरसेवकांसह उपस्थित १२ नगरसेवकांनी ठरावाचे समर्थन केले तर पाच नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपच्याच माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांची पुन्हा निवड निश्चित समजली जात आहे.

भाजपच्या बंडखोर सदस्यांनी पक्षाचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या घडामोडी म्हणजे वैभव पिचड यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो. भाजपचे बंडखोर सदस्य शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट विकास निधीसाठी होती असे सोनाली नाईकवाडी यांनी सांगितले. आज गैरहजर असणाऱ्या ४ भाजप सदस्यांवर व्हिप न पाळल्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

अविश्वास ठरावाच्या निमित्ताने एकत्र आलेले भाजप बंडखोर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (ठाकरे गट) या तीन पक्षाच्या नगरसेवकांची एकी केवळ सत्तेपूरती आहे की त्यातून काही नवीन राजकीय समीकरणे आकार घेतात या वर नगरपंचायतीचे आगामी राजकारण अवलंबून आहे.

चार वर्षापूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपने १७ पैकी १२ जागा जिंकत सत्ता मिळविली. सोनाली नाईकवाडी नगराध्यक्ष झाल्या. कुरघोडीच्या पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला. नंतर वडजे नगराध्यक्ष झाले. अलीकडच्या काळात त्यांच्या विरुद्धही भाजप नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली. नाराज नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे वडजे यांनी राजीनामा न दिल्यामुळे तसेच पक्ष श्रेष्ठिंनीही या नाराज नगरसेवकांच्या मागणीची दाखल न घेतल्यामुळे भाजपच्या १२ पैकी ९ सदस्यांनी नगराध्यक्ष वडजे यांची भाजपप्रणीत शहर आघाडीच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली. गटनेते पद बदल हे नगराध्यक्ष बदलाच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते.

माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी व अन्य १२ सदस्यांनी २० मे रोजी नगराध्यक्ष वडजे व उपनगराध्यक्ष शरद नवले यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीबाबत निर्णय घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांचे अध्यक्षतेखाली आज विशेष सभा बोलाविण्यात आली होती. १७ पैकी भाजपचे ४ व काँग्रेसचा एकमेव सदस्य असे ५ जण आजच्या सभेकडे फिरकले नाहीत. उपस्थित बाराही सदस्यांनी ठरावाचे समर्थन केले. दोन तृतियांश सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी जाहीर केले.

आम्ही सर्व नगरसेवक महायुतीचे असून शहर विकासासाठी तसेच वडजे यांच्या चुकीच्या कारभाराला विरोध म्हणून एकत्र आल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले. शहरातील कामांच्या दर्जाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष वडजे यांच्याकडे हे पद सांभाळण्याची कुवत नव्हती. त्यांचा कारभार भ्रष्ट होता, कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक नसल्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारात अनागोंदी सुरू होती, असा आरोप माजी नगरसेवक पराशराम शेळके यांनी केला.

सहा महिन्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांना निवडणुकीला सामोरे जायचे आहे. सहा महिन्यात नवीन आघाडी कामाचा काय व कसा ठसा उमटविते ही बाब निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.