अकोले: नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या बंडखोर सोनाली नाईकवाडी यांची आज, शुक्रवारी निवड झाली. भाजपच्याच दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या या निवडणुकीत पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्य सचिव सोनाली नाईकवाडी यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना नगरसेवकांच्या सहकार्याने भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी पाठिंबा दिलेल्या वैष्णवी धुमाळ यांचा पराभव केला. माजी आमदार पिचड यांना हा मोठा राजकीय धक्का आहे.
एकहाती सत्ता मिळविलेल्या पिचड यांचे नेतृत्व भाजपच्याच बहुसंख्य नगरसेवकांनी झुगारले व त्यामुळे त्यांना आज नगरपंचायतीची सत्ता गमवावी लागली. पुढील वर्षीच्या जानेवारी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत आजच्या घडामोडींचे राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांपूर्वी पिचड यांच्या नेतृत्वाखालील निवडणुकीत १७ पैकी १२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. अकोल्यात प्रथमच कमळ फुलले. सोनाली नाईकवाडी नगराध्यक्ष झाल्या. मात्र पक्षांतर्गत कुरघोडीमुळे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला व त्यांच्या जागी भाजपचे बाळासाहेब वडजे यांची वर्णी लागली, मात्र त्यांच्याविरुद्धही अलीकडे नाराजी निर्माण झाली होती.
मात्र नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे वडजे यांनी राजीनामा न दिल्यामुळे, तसेच पक्षश्रेष्ठींनी नगरसेवकांच्या नाराजीची दाखल न घेतल्यामुळे भाजपच्या ८ नगरसेवकांनी बंड करीत गटनेते पदावरून वडजे यांची हकालपट्टी केली तसेच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला. भाजप बंडखोर नगरसेवकांना शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन सदस्याची साथ मिळाल्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाला व वडजे यांना पायउतार व्हावे लागले.
सोनाली नाईकवाडी यांनी पिचड विरोधी नगरसेवकांनी एकजूट कायम ठेवल्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज त्यांची निवड झाली व भाजपमधील पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचे चक्र पूर्ण झाले. विरोधी गटातील १२ पैकी एका नगरसेविकेने शेवटच्या क्षणी पिचड गटात प्रवेश केल्यामुळे उपनगराध्यक्षावरील अविश्वास ठराव मंजूर होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिचड यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आजच्या घटनेमुळे बळ मिळणार आहे. भाजपचे जिल्हा परिषदेतील माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांचे पिचड यांचेशी पटत नाही. जिल्हा पातळीवर ते विधानसभेचे उपसभापती राम शिंदे यांच्या बरोबर आहेत तर तालुका पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याशी त्यांचे सख्य आहे.
नगराध्यक्ष निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सक्रिय झालेले वैभव पिचड यांनी नगरपंचायतीमध्ये या पूर्वीच लक्ष घातले असते तर आजची स्थिती निर्माण झाली नसती असे राजकीय जाणकारांचे मत आहे. सोनाली नाईकवाडी आणि भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी पिचड यांच्यावर नगरपंचायतीमध्ये मात केली ती स्वतःच्याच ताकदीवर की त्यांचे मागे भाजपमधीलच कोणा वरिष्ठाचा हात होता हे लवकरच स्पष्ट होईल.
