अकोले : भंडारदरा धरणातून सुरू असणारा विसर्ग आज, शुक्रवारी वाढवून ३ हजार ९४९ क्युसेक करण्यात आला. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज कमी झाला तरी दोन दिवस हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पावसामुळे मुळा धरणात गेल्या चोवीस तासांत ६०६ दलघफू पाण्याची आवक होत, धरण ५६ टक्के भरले.

भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन आज हा विसर्ग वाढविण्यात आला. सायंकाळी स्पीलवे आणि वीजगृह मिळून ३ हजार ९४९ क्युसेक पाणी प्रवरा नदी पात्रात पडत होते.

दोन दिवसांच्या तुलनेत मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज कमी झाला. मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधारेने धरणात पाण्याची मोठी आवक झाली. मुळा धरणात सायंकाळी १४ हजार ७०४ दलघफू साठा झाला. कोतुळजवळ सायंकाळी मुळा नदीचा विसर्ग वाढून ८ हजार २८ क्युसेक झाला. भंडारदरा धरणात सायंकाळी ७ हजार ५६२ दलघफू (६८.५० टक्के) पाणीसाठा झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भंडारदरातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होते. आज निळवंडेचा पाणीसाठा सायंकाळी ४ हजार ८६८ दलघफू ( ५८.४५ टक्के) झाला. निळवंडे धरणातून शेतीसाठी ९०० क्युसेकने आवर्तन सुरू आहे. सायंकाळी हा विसर्ग ६०० क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला. आढळा धरणाच्या सांडव्यावरून १२९ क्युसेक पाणी नदीपात्रात पडत आहे. आजचा पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे- घाटघर ७४, रतनवाडी ६६, पांजरे ५८, भंडारदर ३०, निळवंडे १९, कोतुळ ५, अकोले ८.