अकोले:आई एव्हढेच प्रेम प्रवरामाईवर करा. मुळा, प्रवरा, आढळा या नद्यांवर आपली नितांत श्रद्धा आहे. आजच्या निमित्ताने नदी संवर्धनाचा संकल्प करू या, असे सांगतानाच प्रवरा नदीचे पावित्र्य जपण्याचे व नदी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
येथील रुद्रा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ‘प्रवरामाई महोत्सवा’ची सांगता महाआरतीने करण्यात आली. त्यावेळी आमदार लहामटे बोलत होते. प्रवरा नदी काठची रम्य सायंकाळ, हवेत असणारा किंचित गारठा, खळाळत वाहणारी प्रवरा नदी, विद्युत् रोषणाईने उजळलेला अगस्ती सेतु पुल तसेच पाटील पाणवठा परिसर, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या अकोलेकरांच्या हातातील आरतीच्या ताटातील उजळलेल्या ज्योती आणि मान्यवरांची उपस्थिती अश्या वातावरणात आरतीचे स्वर वातावरणात उमटले. प्रवरा नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे दृश्य पाहून उपस्थित सर्वच जण भारावले. रोषणाईने उजळलेल्या पार्श्वभूमीवरील सामुदायिक महाआरतीचे या दृश्याचे अनेकजण व्हिडिओ काढत होते तर तरुणाई सेल्फी काढण्यात मग्न होती.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे, अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता नवले, संदीप शेणकर, डॉ. संदीप कडलग, अकोले शिक्षण संस्थेचे खजिनदार धनंजय संत, वकील वसंत मनकर, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. लहामटे यांनी रुद्रा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे स्वागत करताना हा उत्सव उत्तरोत्तर मोठा होत जाईल असा विश्वास व्यक्त केला. अगस्ती आश्रमापासून तातोबा बेटापर्यंत प्रवरा परिसराला लाभलेल्या समृद्ध परिसराचा उल्लेख करीत डॉ. लहामटे म्हणाले, रतनगडावर रत्नाईची गुहेत उगम पावणारी प्रवरा नदी रतनवाडीत अमृतेश्वराला भेटते तेव्हा तिचे अमृतवाहिनीमध्ये रुपांतर होते.
प्रवरा नदीच्या सद्यस्थितीबद्दल मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. खास बाब म्हणून एचटीपी. प्लँट ची मागणी करा असे त्यांनी यावेळी उपस्थित नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना सुचविले. नदीवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो, त्या बद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.
आमदार खताळ यांनी संगमनेरमध्ये असा उत्सव सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून १५ कोटी रुपये नदी सुशोभीकरणाला मिळाले आहेत. उर्वरित कामासाठी अधिक निधी मिळविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रवरेच्या काठी आपण जन्माला आलो हे आपले भाग्य असल्याचे सांगत आमदार तांबे यांनी शुभेच्छा दिल्या.
रुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता नवले यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. संदीप शेणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. संदीप कडलग यांनी आभार मानले. आरतीनंतर करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने आसमंत उजळून निघाला.

