अकोले: बिबट्यांची दहशत वेळोवेळी अनुभवलेला अकोले तालुका सध्या विषारी सापांची दहशत अनुभवत आहे. वर्षभरापेक्षाही कमी कालावधीत तालुक्यात सर्पदंशाच्या २०० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. कधीकधी सर्पदंशाचे १०-१२ रुग्ण एकाच वेळेला उपचारासाठी अकोल्याच्या रुग्णालयात दाखल झालेले असतात. सर्पदंशामुळे मागील महिन्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सापांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्याच्या रेस्क्यू केंद्राच्या धर्तीवर पकडलेले विषारी साप सोडण्यासाठी तालुक्यात सापांसाठी रेस्क्यू सेंटर
सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अकोले तालुक्यात वन्य प्राण्यांबरोबरच नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे विषारी सापही सापडतात. पण अलीकडच्या काळात या विषारी सापांची संख्या आणि त्यामुळे सर्पदंशाच्या घटना फार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दहा दिवसांपूर्वी सर्पदंशाच्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी अकोल्यातील दोन रुग्णालयांना भेट दिली. तेव्हा सर्पदंशाचे तब्बल १३ रुग्ण या दोन ठिकाणी उपचार घेत होते. या दोन रुग्णालयांमध्ये अनुक्रमे ११२ आणि ५० असे १६२ सर्पदंशाचे रुग्ण या वर्षात दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली. सर्पदंश झालेले अनेक रुग्ण संगमनेर, नाशिक तसेच अन्यत्र जातात. ही संख्या विचारात घेतली तर २०० पेक्षाही जास्त सर्पदंशाच्या घटना आजपर्यंत घडल्या असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
शेतात काम करताना, गुरे चारताना, चारा काढताना, माणसांना सर्प दंश झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शेतात असणाऱ्या घराबाहेर रात्रीच्या वेळी आले असतानाही अनेकांना सार्पदंश झाले आहेत. येथील डॉ. एम. के. भांडकोळी यांच्या रुग्णालयात गतवर्षी ७० च्या आसपास सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यंदा मागील आठवड्यापर्यंतच ११५ रुग्ण त्यांचे दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले होते. या वर्षीच्या पावसाळ्यात साप चावण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. सापांची वाढती संख्या याला कारणीभूत आहे.
सर्पदंशाच्या वाढत्या घटना या मानव व वन्यजीव संघर्षाचाच एक भाग असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. विकासासाठी डोंगर फोडणे, ओढे नाले यांच्यावरील अतिक्रमण, जंगलतोड आदी विविध कारणांमुळे सापांचे नैसर्गिक अधिवास कमी झाले. त्यामुळे साप मानवी वस्तीकडे येत असल्याचे सांगितले जाते. साप पकडण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता पकडलेल्या विषारी सापांसाठी रेस्क्यू सेंटर सुरू करण्याची गरज आहे. सर्पमित्रांनी पकडलेले साप पुन्हा सोडून न देता या आश्रय केंद्रात सोडले जातील. त्यामुळे विषारी सापांच्या संख्येवर नियंत्रण येईल. वन्य जीव विभागाने प्रायोगिक तत्वांवर असे केंद्र सुरू करावे अशी मागणी होत आहे.
जनजागृतीची आवश्यकता
सापांच्या बाबतीत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. सर्पदंश झाल्यास करावयाच्या प्रभावी प्राथमिक उपचारांसाठी गाव पातळीवर प्रशिक्षण करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना सापांचे खाजगी रेस्क्यू सेंटर सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवाचा,माहितीचा लाभ करून. घेता येईल सापांच्या बाबतीत असणारे अनेक कायदेही बदलण्याची गरज आहे. -सचिन गिरी, सर्पतज्ज्ञ, संगमनेर
