अकोले: जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या निसर्गसंपन्न अकोले तालुक्यात रानभाज्याही विपुल प्रमाणात आढळतात. हा निसर्ग ठेवा जपला पाहिजे, असे सांगतानाच या रानभाज्यांची मात्र बऱ्याच जणांना माहिती नसते. नागरिकांनी पौष्टिक आणि आरोग्यदायी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. रानभाजी घेताना ती कशी बनवायची, तिचे गुणधर्म काय आहेत, त्याची माहितीही करून घ्यावी. रानभाज्यांच्या विविध पाककृती शिका, असे आवाहन आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (राजूर)व सोबती फाउंडेशनने “उत्सव रानभाज्यांचा” या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन डॉ. लहामटे यांच्या हस्ते झाले. सोबती फाउंडेशनच्या अध्यक्ष पुष्पा लहामटे, नगरपंचायत मुख्याधिकारी धनश्री पवार, सहायक प्रकल्पाधिकारी योगेश ढोणे, विनय सावंत, अक्षय आभाळे आदी उपस्थित होते.
पावसाळा सुरू झाला की तालुक्यात रानभाज्या मिळू लागतात. या प्रदर्शनात ग्रामीण भागात सेंद्रिय पद्धतीने, रासायनिक खतांपासून दूर रहात जपलेल्या ५० पेक्षा अधिक रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या तसेच महिलांनी रानभाज्यांपासून विविध पारंपरिक व पौष्टिक पदार्थ तयार केले होते. २० पेक्षा जास्त असे पाककृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यातील उत्कृष्ट पाककृतीना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. आपण लहानपणापासून रानभाज्यांच खातो. चित्रकाची भाजी मांसाहारी पेक्षाही चांगली लागते. गावी घरी गेलो की वडील चित्रकाची कोवळी पाने खुडून आणायचे. आई त्याची भाजी करायची. ती भाजी आणि भाकरी माझी आवड आहे, अशी आठवणही डॉ. लहामटे यांनी सांगितली. अकोल्याच्या बसस्थानकावर रानभाज्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
रानभाज्यांपासून अर्थार्जन होण्याची गरज आहे. रानभाज्या जरी निसर्गात मिळत असल्या तरी तुमच्या कष्टाचे दाम घ्या, असे आवाहन त्यांनी महिलाना केले. पुढील वर्षी रानभाज्यांना कडधान्याची जोड देत रानभाज्या आणि कडधान्य प्रदर्शन भरविण्याचा घोषणा त्यांनी केली. या वेळी प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय उभा करीत एक हजार किलो लोणच्याची विक्री करणाऱ्या शोभना सोनवणे तसेच मोबाईलचा योग्य वापर वापर करून व्यवसाय कसा वाढवता येईल याबाबत सीता पिचड यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
