अहिल्यानगर: राहुरी मतदार संघातील जनतेने स्व. शिवाजी कर्डिले यांच्याप्रमाणेच माझ्यावर विश्वास दाखवला व मला संधी दिली. हा विश्वास आपण आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया विजयाकडे वाटचाल करणारे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी माध्यमांशी बोलताना केली.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. निवडणुकीत भाजपने स्व. शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी सकाळी राहुरीमध्ये सुरू करण्यात आली. मतमोजणीच्या १६ व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना एकूण ८० हजार ४२२ मते मिळून ६५ हजार ८५६ चे मताधिक्य मिळवून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
अक्षय कर्डिले म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती. ही निवडणूक नव्हतीच तर प्रत्येक मतदाराने आपली स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रति असलेली भावना मतातून व्यक्त केलेली आहे. गेली ३० वर्षे कर्डिले यांनी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते, स्थान मिळवले होते. आज ते आपल्यासमवेत नाहीत. परंतु तेवढेच प्रेम, विश्वास जनतेने माझ्याबद्दल दाखवून मला संधी दिली आहे. आगामी काळात जनतेने दिलेली संधीचा उपयोग आपणही प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे अक्षय कर्डिले म्हणाले.
