दापोली : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघ गोव्यातील प्रयोग आटोपून मुंबईच्या दिशेने परतत होता. दरम्यान, भोस्ते घाट उतरत असताना बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. प्राथमिक अंदाजानुसार, घाटातील उतारावर बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातात नाट्यसंघाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले. विलास दाते यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तीन टाके घालावे लागले असून चालकालाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना विलंब न लावता रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच साहित्यप्रेमी उत्तमकुमार जैन यांनीही रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली व आवश्यक ते सहकार्य केले. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २५ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, इतर प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. घाटातील धोकादायक वळणांमुळे आणि वाहनांच्या तांत्रिक बिघाडामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.