अलिबाग- अलिबाग शहरातील संशयास्पद घडामोडींवर नजर ठेवता यावी आणि वाहनचालकांना शिस्त लागावी या उद्देशाने तीन कोटी रूपये खर्चून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा वर्षभरातच बोजवारा उडाला आहे. ४७ कॅमेरे बंद पडले असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हा नियोजन विकास निधीतून नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अलिबाग शहरात सिसीटीव्ही कॅमेरा बसवण्यास मंजूरी देण्यात आली होती. या नुसार अलिबाग शहर आणि आसपासच्या ग्रामपंचायतीमध्ये ३२ ठिकाणी ११६ सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता.

तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या सीसीटिव्ही प्रणालीचा लोकार्पण सोहळा फेब्रुवारी २०२४ मध्ये पार पडला होता. मात्र दोन वर्षातच या सीसीटिव्ही यंत्रणेला बिघाडाचे ग्रहण लागले आहे. शहरातील ४७ कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्याचा उद्देशच फोल ठरत आहे.

अलिबाग शहरातील सीसीटिव्ही यंत्रणेसाठी अलिबाग पोलीस ठाण्यात सुसज्ज कन्ट्रोल रूम उभारण्यात आली होती. ज्यात एकाच वेळी ६४ कॅमेऱ्यांचे चित्रिकरण पाहणे पोलीसांना शक्य झाले. शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची माहिती गाडी नंबरसहीत सॉफ्टवेअरच्या संकलित करण्याची सुविधा यामुळे उपलब्ध झाली.

ज्याचा फायदा वाहतुक पोलीस आणि अलिबाग पोलीसांसाठी होऊ शकणार होता. समुद्र किनाऱ्यांवरील हालचालींवर पोलीसांना पोलीस स्टेशन मध्येच बसून लक्ष ठेवणे शक्य झाले होते. शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवणे, आरोपींचा शोध घेणे सुलभ झाले होते. मात्र ४७ सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत.त्यामुळे या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

नादुरुस्त सिसीटीव्ही तातडीने दुरुस्त करून घेण्याच्या सूचना अलिबाग नगर परिषदेला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबधित ठेकेदार हजर झाला असून सिसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. प्रविण पांडे, पोलीस निरीक्षक अलिबाग