अलिबाग – काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील थळे यांच्या धाकट्या भावाची निघृण हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलीसांनी हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे.मापगावमधील टाकादेवी मंदिराजवळील दगडाच्या खाण परिसरात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

आरोपी हे पोखलेन मशीनच्या साह्याने या परीसरात दगड फोडण्याचे काम करत होते. यावेळी विजय थळे ऊर्फ बाबू  त्या ठिकाणी आले. त्यांनी या उत्खननाला हरकत घेतली. यामुळे आरोपी आणि विजय थळे यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने पोखलेन मशीनच्या ब्रेकरच्या साह्याने विजय यांच्या डोक्यात प्रहार केला. त्यांच्या समवेत असलेल्या आणखिन एका सहकाऱ्यालाही मशिनच्या साह्याने हल्ला करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. ब्रेकरच्या धडकेने विजय थळे जोरात खाली दगड खाणीत कोसळले, ते गंभीररीत्या जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुरवातीला हा अपघात असल्याचे बोलले जात होते. मात्र पोलीसांना संशय आला. त्यांनी   तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांनी तातडीने घटनास्थळाकडे पथक रवाना तातडीने पथक रवाना केले. घटनास्थळाची पहाणी करून तपा केला. तपासानंतर हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलीसांनी याप्रकरणी अबलू ऊर्फ निकेश चंद्रकांत दळवी आणि सोनू ऊर्फ आशीष चंद्रकांत दळवी रा. टाकादेवी बहिरोळे यांना अटक केली.

दोघांनाही अलिबाग येथील न्‍यायलयासमोर हजर करण्‍यात आले. त्‍याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस तालुका अध्यक्षाच्या भावाच्या हत्येची बातमी समोर येताच मापगाव परिसरात खळबळ उडाली. पूर्ववैमनस्‍यातून ही हत्‍या झाल्‍याचा संशय आहे. महत्वाची बाब म्हणजे विजय थळे आणि आरोपी हे नातेलग असल्याचेही समोर आले आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, पोखलेन मशीनच्या सहाय्यानेच त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला, या हत्येमागे वैयक्तिक वाद आहे की आणखी काही कारण आहे , या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत.