अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात मद्यपान करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर ५ जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत.

    २५ नोव्हेंबरला अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात पाच कर्मचारी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर दारू पित असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. शिवराज्य ब्रिगेडच्या निलेश पाटील यांनी याबाबतचा व्हिडीओ समोर आणला होता. कार्यालयात दारूच्या पार्ट्या झोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तसेच मद्यपी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे यामागणीसाठी १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात मद्याची पार्टी ; कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

    जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच या सर्वांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यानंतर आज चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. अव्वल कारकून प्रविण वरंडे, महसूल सहाय्यक सचिन कोंडे, महसुल सहाय्यक संतोष निकम आणि प्रसाद पाटील रखवालदार या चौघांना निलंबित करण्यात आले आहे. त्याच बरोबर या चौघासह महसुल सहाय्यक हेरंब अयरकर यांची महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ अन्वये विभागिय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. बैनाडे यांनी दिली.