अलिबाग – अवैध जंगलतोड त्यात लागणारे वणवे यामुळे वनाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगल, वने पुन्हा हरित करण्यासाठी अलिबाग वन विभागाने माझे वन उपक्रम राबवला आहे. विशेष म्हणजे शासनाचा एकही रुपया न घेता वन कर्मचारी, अधिकारी हे स्वखर्चाने दहा एकरवर ही लागवड करीत आहेत. असा स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात राबवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे माझे वन उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी आदिती तटकरे यांच्या हस्ते माझे वनचे उद्घाटन करून वृक्ष लागवड करण्यात आली. या वनाला वरदाई वनराई असे नाव देण्यात आले आहे. उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वन संरक्षक भाऊसाहेब जवरे, अलिबाग वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील, सरिता भगत, वन अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. वाडगाव येथे दहा एकरात विविध झाडाची लागवड केली आहे.
वनाची संपदा टिकवणे आपल्या हातात आहे. आजच्या पिढीला हे कळणे आवश्यक आहे. वन संपदेला हानी पोहोचल्याने वातावरणातही बदल घडत आहेत. त्यामुळे अलिबाग वन विभागाने सुरू केलेले माझे वन उपक्रम भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे. वाडगाव येथे केलेल्या माझे वन उपक्रमात आदिवासींना सामावून घेऊन लावलेल्या फळाच्या झाडाचे उत्पन्न त्यांना द्या अशा सूचना आदिती तटकरे यांनी केल्या. वणवे लागून वनाची हानी होत आहे. यावर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. वन विभागाने वणवे लावणाऱ्या वर कारवाईचा बडगा उचलावा अशा सूचनाही तटकरे यांनी केल्या आहेत.
झाडांसाठी लागणारे खत हे वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत दिले जाईल असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले. जिल्ह्यातही हा उपक्रम राबवून राज्यात एक आदर्श निर्माण होऊ शकतो असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. आम्ही पदावर असे पर्यंत एक उत्तम काम करून जावे या दृष्टीने माझे वन ही संकल्पना राबवली. आम्ही गेल्यानंतरही आमच्या कार्यामुळे ओळख राहावी या दृष्टीने हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला अधिकारी, कर्मचारी यांनी साथ दिल्याने शक्य झाले असे मत उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी व्यक्त केले.
नक्षत्र वन बनवा
अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे. लाखो पर्यटक अलिबागला भेट देतात. वन विभागातर्फे अलिबागमध्ये नक्षत्र वन बनवल्यास स्थानिक आणि पर्यटकांचे प्रेक्षणीय स्थळ निर्माण होऊ शकते. तसेच यातून उत्पन्न ही मिळून माझे वन उपक्रमाला हातभार लागू शकतो. त्यामुळे अलिबागेत नक्षत्र वन निर्माण करा अशा सूचना आदिती तटकरे यांनी वन अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
