अलिबाग – अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील प्राचीन शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेल्या ब्रिटिशकालीन शिलालेखामुळे कोकणाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्याने उजेडात आला आहे. शके १८२० (इ.स. १८९८) मधील या चार ओळींच्या शिलालेखाचे संशोधन व वाचन कोकण इतिहास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी केले असून, त्यातून शैव परंपरा, पुरी संप्रदायाची गुरू-शिष्य परंपरा आणि तत्कालीन मंदिर व्यवस्थापनाविषयी महत्‍वाची ऐतिहासिक माहिती समोर आली आहे.

कोकणातील इतिहास संशोधनात शिलालेख, ताम्रपट आणि पुरातत्त्वीय अवशेषांना विशेष महत्त्व आहे. मात्र, ब्रिटिशकालीन ग्रामीण मंदिरांशी संबंधित अशा स्वरूपाचा शिलालेख अत्यंत दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे कुसुंबळे येथील हा शिलालेख इतिहास अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण अभिलेखीय पुरावा ठरत आहे.विशेष म्हणजे, ब्रिटिश राजवटीच्या काळात अलिबाग हे प्रशासकीय केंद्र असतानाही ग्रामीण भागातील धार्मिक संस्था, मठपरंपरा आणि मंदिरांचे व्यवस्थापन प्रभावीपणे सुरू असल्याचे या शिलालेखातून स्पष्ट होते. त्या काळात धार्मिक संस्थांनी केवळ पूजा-अर्चाच नव्हे, तर मंदिरांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि सामाजिक-धार्मिक परंपरा जपण्याचे कार्यही सातत्याने केले होते.

शिलालेखातील उल्लेख महत्त्वाचा

शिलालेखातील मजकुरात “बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी व चिदापुरीचे मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार नातू देऊपुरी, गुरू मंगळपुरी” असा उल्लेख आढळतो. तसेच “गौरशिवचे पु. पांडू बामणा” अशी नोंदही कोरलेली आहे. शेवटी “शके १८२०, विलंबी नाम संवत्सरे” अशी स्पष्ट कालनोंद असल्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार इ.स. १८९८ मध्ये झाल्याचे निश्चित होते.या शिलालेखातील प्रत्येक नाव धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा दुवा मानला जात असून, त्यातून त्या काळातील मठसंस्था आणि मंदिर व्यवस्थापनाची सुसंघटित रचना अधोरेखित होते.

पुरी संप्रदायाच्या अस्तित्वाचा पुरावा

प्रा. डॉ. अंजय धनावडे यांच्या संशोधनानुसार बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी, चिदापुरी, देऊपुरी आणि मंगळपुरी ही नावे दशनामी गोसावी परंपरेतील पुरी शाखेशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा शिलालेख केवळ जीर्णोद्धाराची नोंद नसून, कोकणातील पुरी संप्रदायाचे अस्तित्व, त्यांची गुरू-शिष्य परंपरा आणि मंदिरांच्या व्यवस्थापनातील योगदान अधोरेखित करणारा महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो. कोकणातील अनेक प्राचीन मंदिरांच्या जतनात आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्यात पुरी संप्रदायाने मोलाची भूमिका बजावली असून, हा शिलालेख त्या कार्याचा ठोस पुरावा मानला जात आहे.

शिवकालाशीही जोडला जातो संदर्भ

इतिहासातील उपलब्ध नोंदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निश्चलपुरी यांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे कोकणातील पुरी संप्रदायाचे अस्तित्व किमान सतराव्या शतकापासून असल्याचे संकेत मिळतात. कुसुंबळे येथील शिलालेख हा त्या परंपरेचा ब्रिटिशकालीन दुवा असल्याने शैव परंपरेच्या सातत्याचा अभ्यास करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.इतिहास अभ्यासकांच्या मते, अशा शिलालेखांचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण आणि संवर्धन झाल्यास कोकणाच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अनेक अज्ञात पैलू पुढे येण्यास मदत होणार आहे.

“कुसुंबळे येथील हा शिलालेख केवळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची नोंद नाही, तर कोकणातील शैव परंपरा, पुरी संप्रदायाचे कार्य आणि गुरू-शिष्य परंपरेचा ऐतिहासिक पुरावा आहे. ब्रिटिशकालीन धार्मिक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. प्रा. डॉ. अंजय धनावडे, जिल्हाध्यक्ष, कोकण इतिहास परिषद (रायगड)