अलिबाग- महावितरण कडून जून महिन्यातील वीज देयकांचे वितरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. वीज देयके १५ जून पर्यंत प्राप्त होणे अपेक्षित असतांना देयकांची मुदत संपली तरी प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महावितरणकडून तातडीने वीज देयकांचे वितरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
अलिबाग परिसरात दर महिन्याच्या तीन ते चार तारखेला वीज देयकांसाठी मीटर रिडींग घेतले जाते. नंतर १० तारखेपर्यंत वीज देयके तयार केली जातात. ज्यांचे वितरण १३ ते १४ तारखेपासून सुरू होत असते यंदा मात्र जुलै महिना उजाडला आणि वीज देयकांची मुदत संपली तरी अनेक ग्राहकांना वीज देयक मिळालेली नाहीत. त्यामुळे वीज देयकांचा भरणा कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे.
महत्वाची बाब म्हणजे याबाबत महावितरण कंपनीकडे विचारणा केली असता त्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे सल्ला दिला जात आहे. अथवा ऑनलाईन वीज देयक घेण्याचा अथवा वॉट्स अँपवर वीज देयकांची मागणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. अथवा कार्यालयात येऊन वीज देयकांची प्रत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या जात आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वीज देयके वितरण ठेकेदारांमार्फत केले जात होते. या ठेकेदारांकडून वीज देयकांचे वितरण योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यात वाद निर्माण होत आहेत. ज्या ग्राहकांना वीज देयके मिळाली नाहीत त्या ग्राहकांनी कार्यालयातून वीज देयके घेऊन जाणे अपेक्षित असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
वीज देयके मिळाली नाहीत तरी मोबाईलवर एसएमएस आले असल्याचे सांगतले जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप आहे. नियमित वीज देयके मिळाली तर वीज देयकांचा भरणाही नियमित होईल त्यामुळे महावितरणने तातडीने वीज देयकांचे वितरण सुरू करावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज देयक न भरल्यास वीज पूरवठा स्वयंमचलित पध्दतीने खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज देयकेच प्राप्त झाली नाही तर वेळेत भरायची कशी असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. दुसरीकडे सोलार रुफ टॉप योजनेचे ग्राहकांना जी देयके ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात आली आहे. त्यात जनरेशन मीटर रिडींग दाखविण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गेल्या महिन्याची वीज देयके अजून मिळालेली नाहीत. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली तर ते ऑनलाईन वीज देयके घेण्याचा आणि स्मार्ट मीटर बसविण्यास सांगत आहेत. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार दिसतो आहे.-विवेक पाटील, ग्राहक
काही तांत्रिक अडचणीमुळे वीज देयके ग्राहकांपर्यंत पोहोचलेली नाही. ज्यांना वीज देयके मिळाली नाहीत, त्यांना ती कार्यालयातून उपलब्ध करून देत आहोत. या शिवाय ऑनलाईन पध्दतीने वीज देयके प्राप्त करता येणार आहेत. आकाश तायडे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता महावितरण.
