अलिबाग : पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाबाधितावर केले अंत्यसंस्कार

नातेवाईक आणि गावकऱ्यांनी फिरवली पाठ

corona patients
(संग्रहित छायाचित्र)

आजकाल करोनाचा लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला करोना झाला असं कळलं तरी रक्‍ताच्‍या नात्‍याची माणसंही दूर पळतात . असाच अनुभव म्‍हसळा तालुक्‍यातील केलटे गावात आला. करोनामुळे मृत्यू झालेल्‍या व्‍यक्‍तीवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यास घरच्‍यांनी नकार दिला अखेर पोलीस, महसूल कर्मचारी आणि पत्रकार यासाठी धावून आले आणि त्‍यांनीच अंत्‍यसंस्‍कार केले आणि करोनासारख्‍या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले .

महसळा तालुक्‍यातील दुर्गम डोगराळ भागात असलेल्‍या केलटे गावातील एका ७६ वर्षीय वृद्धाचा ३० एप्रिल रोजी रात्री करोनामुळे मृत्‍यू झाला. परंतु घरच्‍यांनी मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास आणि अंत्यंस्कार करण्‍यास नकार दिला. त्‍यांचा मुलगा काही दिवसांपूर्वीच करोनाच्‍या जीवघेण्‍या आजारातून बाहेर आला होता, तो देखील वडिलांच्‍या अंत्‍यविधीसाठी पुढे आला नाही किंवा कुणी ग्रामस्‍थांनी देखील याकामी पुढाकार घेतला नाही. अशावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार कुणी करायचे? हा मोठा प्रश्‍नच होता.

अखेर ग्रामस्‍थांनी म्‍हसळयाचे मंडल अधिकारी दत्‍ता कर्चे यांच्‍याशी फोनवरून संपर्क साधला. कर्चे यांनी तत्‍काळ प्रांताधिकारी अमित शेडगे यांना कळवले. यानंतर तहसीलदार शरद गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कर्चे यांनी तातडीने पत्रकार निकेश कोकचा व पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस नाईक सुर्यकांत जाधव, १०८ रूग्‍णवाहिकेचा पायलट शरद नांदगावकर व भरत चव्हाण यांना बोलावून घेतले. या सर्वांना विश्‍वासात घेवून याबाबतची माहिती दिली. ही सर्व मंडळी गावात पोहोचली आणि तातडीने कामाला लागली . कोणतीही भीती न बाळगता अंगावर पीपीई कीट चढवले आणि मग अंत्यसंस्काराची तयारी केली. स्‍मशानभूमी गावापासून दूर दोन किलोमीटर अंतरावर आहे. या मोजक्‍याच मंडळीनी तिथं अंत्यसंस्‍कार पूर्ण केले. त्‍यांच्‍या या धाडसाचे आणि दाखवलेल्‍या माणूसकीचे परिसरात कौतुक होत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alibag police journalists government employees performed cremation of a corona patient msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या