अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेच्या दोन नवीन इमारतींचे बांधकाम दिवाळी नंतर सुरू होणार आहे. इमारतीसाठी आवश्यक सर्व तांत्रिक मान्यता मिळाल्या प्राप्त झाल्या असून, सिआरझेड क्षेत्रात बांधकामासाठी आवश्यक मान्यताही प्रप्त झाली आहे. त्यामुळे दोन्ही इमारतींच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करता येणार आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १२५ कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे. थोरवे अँण्ड थोरवे कन्स्ट्रक्शन कंपनीया या कामांची बांधकाम निविदा देण्यात आली आहे. एमसीझेडएमए कडून दोन्ही इमारतींच्या बांधकामांना परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामांमधील मोठा अडसर दूर झाला आहे.जिल्हा परिषदेची शिवतीर्थ ही जूनी इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली होती. या इमारतीमधील सर्व कार्यालये अलिबाग येथील कुंटेबाग येथे तात्पुरती स्थलांतरीत करण्या आली होती. नवीन इमारतीच्या बांधकामाला उच्चाधिकार समितीने यापुर्वीच मान्यता दिली होती.

मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्याने नवीन इमारतींचे काम सुरु होऊ शकले नव्हते. सहा महिन्यांपूर्वीच जून्या आणि जीर्ण झालेल्या इमारतीचे पाडकाम करण्यात आले होते. दोन्ही नवीन इमारती या सिआरझेड क्षेत्रात येत असल्याने, त्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियमन प्राधिकरणाकडून परवानगी मिळणे आवश्यत होते. ही मान्यताही आता प्राप्त झाली असल्याने, नवीन इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सूरूवात होणार आहे.

जिल्हा परिषदेची मुख्य इमारत ही जुन्या इमतारती जागेवर होणार आहे.  शिवतीर्थ इमारत पाडून त्याजागेवर सात मजली सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. तर दुसरी इमारत ही अलिबाग पंचायत समिती कार्यालया जवळ उभारली जाणार आहे. जी पाच मजली असणार आहे.

  नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, दिवाळी नंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. इमारतीच्या बांधकामांची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून, राज्यसरकारकडून निधीही प्राप्त झाला आहे.

 कशी असेल नवीन इमारत ?

   नवीन इमारतीत तळ मजल्यावर पूर्णपणे पार्किंगची व्यवस्‍था असून त्‍यावर सात मजले असतील. जिल्हा परिषदेचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. साधारण ५५० कर्मचाऱ्यांच्या कामासाठी प्रशस्त जागा निर्माण केली जात असून अभियंत्यांसाठी स्‍वतंत्र कक्षाचे नियोजन आहे. इमारतीमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या दालनांची अंतर्गत सजावट आधुनिक शैलीत असली तरी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तर दुसरी इमारत ही पंचायत समिती कार्यालया शेजारी उभारण्यात येणार आहे. 

इमारतीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. निविदा प्रक्रीया झाली असून, ठेकादार कंपनीही नियुक्त झाली आहे. जुन्या इमारतीचे पाडकाम करून सपाटीकरण झाले आहे. त्यामुळे दिवाळी नंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करता येईल.० विनायक तेलंग, कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद