अलिबाग: रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे अलिबागची वाट येत्या पावसाळ्यात खडतर होण्याची चिन्ह दिसत आहे. अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड आणि कार्लेखिंड- कणकेश्वर फाटा या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे अपूर्णावस्थेत असलेल्या या रस्त्यांच्या कामांचा अलिबागकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत कामांना गती देण्याची मागणी केली जात आहे.

अलिबाग ते रोहा रस्‍त्‍याच्‍या रूंदीकरण आणि नूतनीकरणाचे काम हॅम (हायब्रीड अॅन्‍युईटी मॉडेल ) या पदधतीने विकसीत केला जात आहे. या कामासाठी तब्‍बल २२९ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्‍यात आले होते. परंतु ३ वर्षानंतरही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे मार्गावरील प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे.

अलिबाग मुरुड रस्त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून या मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दोनशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे कामही अतिशय संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या कमासाठी अतिशय सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता ठेकेदारांकडून उखडून टाकला आहे. टप्प्या टप्याने हे काम करणे अपेक्षित असतांना संपूर्ण रस्ता उखडून टाकण्यात आला आहे. आता क्राँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले असले तरी, कामाचा वेग अतिशय संथ आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. हीबाब लक्षात घेतली तर पावसाळ्यात अलिबाग मुरुड दरम्यानचा प्रवास अतिशय खडतर ठरण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड ते कणकेश्वर फाटा रस्त्याची परिस्थिती फारशी वेगळई नाही. या मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र कामाचा वेग आणि दर्जा यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे कामही पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईकडून मांडव्याकडे येणाऱ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे. आरसीएफ कंपनीतून होणारी अवजड वाहतूकही याच मार्गाने केली जाते अशा परिस्थितीत या रस्त्याचे काम रखडले तर त्याचा मोठा फटका या मार्गावरील वाहनचालकांना बसणार आहे.

अलिबाग मांडवा मार्गावरही कणकेश्वर फाटा ते धोकवडे दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अलिबागच्या रस्त्यांची दुरावस्था ही मोठी समस्या ठरण्याची चिन्ह दिसत आहे. अलिबाग वडखळ मार्गाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने हा रस्ता सोडला तर इतर सर्व प्रमुख रस्त्यांची परिस्थिती योग्य नियोजना अभावी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.

अलिबाग रोहा मार्गाचे काम अपूर्ण आहे. तरीपण बिले मात्र अदा करण्यात आली असल्याचे सांगीतले जात आहे. प्रवाश्यांचे, विद्यार्थ्यांचे, लोकांचे हाल काही संपलेले नाहीत. या मार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाची चौकशी व्हायला हवी.

  • अजय उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते

विकास नको पण रस्ते आवरा असे म्हणायची वेळ आली आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे. कामाला अजिबात गती नाही. धुळीचे साम्राज्य आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पण काम काही मार्गी लागतांना दिसत नाहीत. हीच परिस्थितीत राहीली तर प्रवासी अपघातजन्य परिस्थिती ढकलले जातील. याची पर्वा ना अधिकारी ना लोकप्रतिनिधींना आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.

  • दिलीप जोग, खड्डे अँक्टीव्हिस्ट