अलिबाग: प्रेम प्रकरणात झालेल्या किरकोळ वादातून प्रियकराने थेट प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची घटना रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या हत्येनंतर प्रियकराने स्वतः गळफाळ लावून आत्महत्या केली आहे. रोहा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

ते दोघेही एकाच गावातील रहिवाशी होते. ती वीस वर्षांची होती. तर तो २७ वर्षांचा होता. दोघांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमप्रकरणात झाले. त्यामुळे दोघांच्या गाठीभेटी होत होत्या. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार, सोमवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून प्रियकराला राग अनावर झाला. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने प्रेयसीला मारहाण सुरू केली. रागाच्या भरात त्याने तिचा गळाच आवळला. ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर तो भानावर आला. पण तोवर उशीर झाला होता.

रागाच्या भरात त्याने एका मुलीचा हकनाक बळी घेतला होता. आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यामुळे तो चांगलाच घाबरला. त्याला घरात पडलेली एक नायलॉनची दोरी दिसली. दोरी उचलून पंख्याला बांधली, आणि गळफास लावून आत्महत्या केली.

मंगळवारी दोघांचा शोधाशोध केल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेतील प्रियकर हा काही दिवसांपूर्वीच सशस्त्र सुरक्षा दलात भरती झाला होता. ट्रेनिंग पूर्ण करून तो आपल्या गावी परतला होता. मात्र गावी परतल्यानंतर ही घटना घडली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामे करून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. हे मृतदेह शवविच्छेदन आणन न्यायवैद्यक तपासणीसाठी रोहा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्या पथकाखाली या घटनेचा पूढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस तपासानंतर या घटनेमागील पूढील माहिती समोर येणार आहे.