अलिबाग- लग्नाची तयारी झाली होती. वधुवर पक्षातील मंडळी आणि आप्तेष्ट उपस्थित होते. लग्नाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सर्व जण आनंदी होते. तेवढ्यात पोलीस लग्न मंडपात दाखल झाले. त्यांनी वधुवरांची समजूत काढली आणि विवाह रोखला गेला.

तुम्हालाही प्रश्न पडला असेल असे का झाले. कारण वधु आणि वर हे दोघेही अल्पवयीन होते. त्यामुळे पोलीसांनी या घटनेची माहिती मिळताच, स्वतः पुढाकार घेऊन बालविवाह रोखला. रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाहाविरोधात पोलिसांनी प्रभावी पावले उचलत दोन बालविवाह रोखण्यात यश मिळवले असून एका प्रकरणात कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलींचे आयुष्य अंधारात जाण्यापासून वाचले आहे.

पहिली कारवाई मौजे गायचोळे आदिवासी वाडीत १६ मार्च २०२६ रोजी करण्यात आली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच वाडीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणासोबत लावण्याची तयारी सुरू होती. याबाबत पोलीस दिदी मंगल टेमकर यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांना ताब्यात घेऊन बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत कायद्याची माहिती देत समुपदेशन करण्यात आले आणि विवाह थांबवण्यात आला.

दुसरी कारवाईही त्याच परिसरात करण्यात आली. मे २०२६ मध्ये नियोजित असलेल्या आणखी एका बालविवाहाची माहिती चणेरा बीट अंमलदार नरेश मोरे यांना मिळाली. प्रभारी अधिकारी सुयश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना समज देत हा विवाहही रोखला. स्थानिक ग्रामस्थ व ग्रामसेवक यांच्या मदतीने समुपदेशन करत कुटुंबीयांचे मतपरिवर्तन करण्यात आले.

दरम्यान, भुवनेश्वर आदिवासी वाडीत घडलेल्या एका गंभीर प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. २८ जून २०२५ रोजी अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पूर्वसूचना देऊनही संबंधितांनी हळदी समारंभ पार पाडला. तपासात मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तसेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केल्याचे उघड झाल्याने आरोपी अक्षय पवार व इतर संबंधितांवर भा.न्या.सं. तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. ज्या अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्याचे आवाहन रायगड पोलीसांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजात बालविवाहाची प्रथा अजूनही अस्तित्वात आहे. ज्यामुळे लहान वयातच मुलांची लग्न लावून दिली जातात. ज्यामुळे कमी वयात अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचा भार टाकला जातो. सातत्याने घडणाऱ्या या घटनांची दखल घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी बालविवाह रोखण्यासाठी सामाज जागृती मोहीम हाती घेतली आहे. ठिकठिकाणी जनजागृतीकरून बालविवाह रोखण्याचे आवाहन पोलीसांकडून केले जात आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत.