अलिबाग:- लग्नाचे अमिश दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला महागात पडले आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपींला १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिड लाखाहून अधिक रुपयांचा दंडही ठोठावला. नागेश पोपट गावडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर घटना ही २०१३ ते २०१५ या कालावधीत घडली होती. आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही पोलीस दलात कार्यरत होते. यावेळी दोघांची ओळख झाली. आरोपी या गावडे यांनी लग्न झाल्याचे लपवून फिर्यादी महिलेशी जवळीक साधली. लग्नाचे आमिष दाखवून आधी शारिरीक संबध प्रस्तापित केले. नंतर पिडीत महिलेची नकळत चित्रफीत तयार करून तिला धमकावत जबरदस्ती करत संभोग केला.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६, ३५४ अ,ब,क, ४२०, ४१७, ३२३, ५०६ सह माहीती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (अ) (ई), ६७ (अ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अलिबागच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर तिवारी यांच्या न्यायालयात सुरू होती. यावेळी सराकरी अभियोक्ता म्हणून कोमल राठोड यांनी काम पाहीले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि आरोपी नागेश गावडे याला दोषी ठरवले. गावडे यास भा. द. वि. सं. कलम ३७६ अन्वये १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड , तसेच भा. द. वि. सं. कलम ३७६ (२) (एन) अन्वये १४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला इतर कलमां अंतर्गतही शिक्षा सुनावली. पोलीस कर्चच्याऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याने रायगड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

