अलिबाग : होणाऱ्या पत्नीला घेऊन पर्यटनास आलेल्या तरुणाचा वरसोली येथील लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान तरुणाचा मृत्यू नेमक कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
मुरुड तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय तरुणाचे नुकतेच लग्न ठरले होते. त्यामुळे तो होणाऱ्या पत्नी सोबत घेऊन वरसोली समुद्रकिनारी फिरण्यास आला होता. वरसोली येथील एका लॉज वर त्यांनी रुम आरक्षित केली होती. याठिकाणी वास्तव्यास होते. नव्या आयुष्याची सुरवात करण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण नियतीच्या मनात काही भलतेच होते.
एकमेकांच्या सहवासात असतांना तरुणाचा अकस्मात मृत्यू झाला. घाबरलेल्या तरुणींनी तरुणाचा मृतदेह सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आणला. मुलाच्या नातेवाईकांना वर्दी दिली. यावेळी तरुणाचे नातेवाईक ही रुग्णालयात पोहचले. नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे नाही असे सांगून मृतदेह घेऊन गेले. मात्र या घटनेची खबर पोलिसांना मिळाली. त्यांनी हस्तक्षेप करून मुलाचा मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पंचवीस वर्षे तरुणांच्या अकस्मात मृत्यू मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सूरू असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले. तर शवविच्छेदन आणि विसेरा रिपोर्ट प्राप्त झाल्यावरच मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल असे अतिरीक्त शल्यचिकीत्सक डॉ. शितल जोशी यांनी दिली.
अपघात विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा
दरम्यान तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर मृतदेह अपघात विभागात आणण्यात आला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याची तातडीने वर्दी पोलीसांना देणे आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करून घेणे आवश्यक होते. मात्र यावेळी अपघात विभागात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या तसाच घेऊन जाऊ दिला. हीबाब रुग्णालय प्रशासन आणि पोलीसांच्या लक्षात आल्यावर त्यांना शोधाशोध सुरू केली आणि मृतदेह नातेवाईकांना पुन्हा रुग्णालयात घेऊन येण्यास भाग पाडले.
