अलिबाग – निरागस बालपणाला मायेची ऊब, प्रेमाचा आधार आणि सुरक्षित भविष्य देणारा हृदयस्पर्शी सोहळा अलिबागमध्ये पार पडला. वात्सल्य ट्रस्ट, मुंबई संचलित अलिबाग येथील शिशुगृहातील ‘राम’ या चिमुकल्याला युरोपातील माल्टा देशातील दांपत्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तक घेतले. एका बालकाला हक्काचे कुटुंब मिळाल्याने शिशुगृहात भावूक वातावरण निर्माण झाले.

या दत्तक विधान सोहळ्याला रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी, अलिबाग पंचायत समितीच्या माजी सदस्या जुईली दळवी-जुईकर आणि संस्थेच्या पदाधिकारी सुचेता पटवर्धन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नव्या पर्वाची सुरुवात

माल्टातील दांपत्याने ‘राम’ला प्रेमाने जवळ घेतले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. एका चिमुकल्याला आई-वडिलांचे प्रेम, कुटुंबाचा आधार आणि सुरक्षित भविष्य मिळण्याचा हा क्षण सर्वांसाठी भावूक ठरला. ‘राम’च्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात या सोहळ्याने झाली.

प्रास्ताविकात सुचेता पटवर्धन यांनी वात्सल्य ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. अनाथ, निराधार आणि गरजू बालकांना सुरक्षित वातावरण, प्रेमळ संगोपन आणि कायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे कुटुंब मिळवून देण्यासाठी संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मानसी दळवी यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून अशा उपक्रमांना समाजाने पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली.

‘राम’ला मिळालेले नवे कुटुंब म्हणजे त्याच्या आयुष्यात उमललेली आशेची नवी पालवी आहे. त्याचे बालपण प्रेम, आनंद आणि सुरक्षिततेच्या छत्राखाली फुलावे, अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.