अलिबाग : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम राबविण्यात आली. या प्रक्रियेनंतर प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात ३ लाख ९ हजार मतदारांपैकी २ लाख ६६ हजार जणांची नावे प्रारूप यादीत आहेत. या यादीतील ४२ हजार जणांना निवडणूक विभागामार्फत नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. आता या २० टक्के मतदारांना सुनावणीस हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
अलिबाग तालुक्यातील बागमळा येथे राहणार्या राजेश भोस्तेकर एसआयआर प्रक्रियेदरम्यान गणना प्रपत्र भरून दिले होते. त्यांची २००२ च्या मतदार यादीशी जोडणीही झाली होती. एसआयआर प्रक्रियेनंतर प्रसिद्ध करण्यात (पान ३ वर) (पान १ वरून) आलेल्या प्रारूप मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते. पण, तरीही त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. जोडणी चुकीची झाली असल्याने कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भोस्तेकर यांच्या कुटुंबातील ११ जणांना अशाच नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. प्रकाश सोनवडेकर यांनीही गणना प्रपत्र भरून दिले होते. २००२ च्या यादीशी त्यांची जोडणी झाली होती. प्रारूप मतदारयादीत त्यांचे नावही आले होते. मात्र, तरीही त्यांना निवडणूक विभागाची नोटीस प्राप्त झाली आहे. वडिलांच्या आणि त्यांच्या वयातील फरक कमी असल्याचे सांगत त्यांना कागदपत्र घेऊन हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सोनवडेकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही अशाच नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सर्व मतदारांचे आक्षेप दूर केले जातील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
नावे वगळणार?
अलिबाग विधानसभा मतदारसंघात ४२ हजार मतदारांना अशा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अलिबाग मतदारसंघात ३ लाख ९ हजार मतदार होते. एसआयआर प्रक्रियेनंतर २ लाख ६६ हजार मतदार शिल्लक राहिले. ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत प्रसिद्ध करण्यात आली होती. आता प्रारूप यादीत नावे असलेल्या ४२ हजार मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एसआयआर प्रक्रियेदरम्यान रायगड जिल्ह्यातील पावणेसहा लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अजून १ लाख ९८ हजार मॅपिंग न झालेले आणि १ लाख ८४ हजार संदिग्ध (अँनामोली) मतदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असलेल्या ४२ हजार मतदारांना नोटिसा आल्या आहेत. याचा अर्थ ही सर्व नावे वगळली जाणार असे नाही. संगणकीकृत प्रक्रियेत काही त्रुटी समोर आल्या आहेत. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करून या सर्व मतदारांचे आक्षेप दूर केले जातील. -मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी, अलिबाग
