scorecardresearch

अलिबागचा पांढरा कांदा तेजीत; लहान कांद्याची १५० तर मोठय़ा कांद्याची २५० रुपयाने विक्री

रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे.

हर्षद कशाळकर

अलिबाग : रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. लहान कांदा १५० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. मागणी वाढल्याची तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांद्याचे दर चढे आहेत.

अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर आलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. पूर्वी अलिबाग तालुक्यात १०० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड होत असे. यंदा अलिबाग तालुक्यात २२७ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती.

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाही. जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्रे फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने पांढरा कांदा यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. मागील वर्षी २३० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. यंदा केवळ अलिबाग तालुक्यात २२७ हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा काही प्रमाणात कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. रोप कुजल्याने लागवडी खालील क्षेत्र घटले आहे.

मात्र नंतर पीक जोमाने आले आहे. पांढऱ्या कांद्याचा आकार मोठा असल्याने कांद्याला चांगला दरही मिळत आहे. अगदी सुरुवातीला ३५० रुपये दराने कांद्याची माळ विकली गेली. आता बाजारात आवक वाढल्याने आता लहान कांदा १५० ते २०० रुपये माळ तर मोठा कांदा २५० ते २८० रुपये प्रती माळ दराने पांढरा कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

भौगोलिक मानांकनामुळे मागणी वाढली

रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला गेल्या वर्षी भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या कांद्याला असणारी मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मात्र त्या तुलनेत यावर्षी उत्पादन वाढलेले नाही. पूर्वी रायगड जिल्ह्यातच या कांद्याला मोठी मागणी होती. आता मात्र मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातूनही कांद्याची मागणी होत आहे.

निर्यातीसाठी प्रयत्न

या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने सेंद्रिय पध्दतीने घेतले जाते. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे कांद्याला आंतराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळू शकते. पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर आता कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना यासाठी कृषी विभागामार्फत प्रोत्साहन दिले जात आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने निर्यात होऊ शकली नसली तरी पुढील वर्षी या कांद्याची निर्यात करण्याचे उद्दिष्ट असणार, अशी माहिती कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alibag white onion boom small onions large onions high price ysh

ताज्या बातम्या