अलिबाग – कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागला प्रदुषणाचा विळखा बसला आहे. अलिबाग मधील हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला आहे. वेदर डॉट कॉम वर हवेचा निर्देशांक २२५ वर पोहोचला होता. एमएसएन वेदर रिपोर्टवर हा निर्देशांक २१९ दाखवत होता.

अलिबागमध्ये आर्द्रता असल्याने प्रदूषके साचून राहतात. त्यातच या परिसरात सुरु असलेली बांधकामे, रस्त्यांची कामे, आसपासच्या औद्योगिक प्रकल्पामधून होणारे उत्सर्जन यामुळे हवेचा दर्जा खालावण्यास हातभार लावत असल्याचे दिसते आहे. हवेचा निर्देशांक सातत्याने १००च्या वर असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.

भारतीय हवामान विभागाने अलिबाग शहरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर कोकणातील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही प्रदूषणात भर घालतात.

पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे. याशिवाय भात कापणीनंतर शेतात राहीलेली भाताची मुळे जाळण्याची प्रथा प्रचलित आहे. डंपिंग ग्राऊंण्डवर तसेच इतरत्र टाकण्यात आलेल्या कचऱ्याला बरेचदा आग लावली जाते, ज्यामुळेही हवेची गुणवत्ता ढासळते. शनीवार आणि रविवारी मोठ्या संख्येनी पर्यटक या परिसरात येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढले. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

हवेचा दर्जा ढासाळल्याने काळजी काय घ्यावी ?

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.