अलिबाग– दुबईच्या धर्तीवर अलिबाग येथे भव्य मत्सालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र निरनिराळ्या कारणामुळे हे काम रखडले होते. मात्र आता या कामाला गती मिळाली असून, प्रकल्पाचे ६० टक्के काम पुर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यात उर्वरीत काम मार्गी लागण्याची आशा आहे. या प्रकल्पामुळे अलिबागच्या पर्यटनाला नवी उमेद मिळण्याची आशा आहे.

अलिबाग नगर परिषदेच्या विशेष अनुदान योजने अतंर्गत अलिबाग समुद्र किनारी भव्य मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाचा भूमिपूजन पार पडला होता. सहा महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निरनिराळ्या कारणांनी प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र आजा या कामाला पुन्हा गती मिळआली असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा नगराध्यक्ष अक्षया नाईक आणि बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकल्पासाठी राज्यशासनाने ६० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहेत. विवीध प्रकारचे सागरी मासे या मत्स्यालयात ठेवले जाणार आहेत. ४० फूट लांबीच्या मत्स्यालय टनेलचा यात समावेश असणार आहे. या शिवाय या मत्स्यालयात पर्यटकांना पाण्यात उतरून सागरी जीवसृष्टीचा अनुभव घेता येणार आहे. फूड कोर्ट आणि कॅफेटेरीयाचाही या समावेश असणार आहे. दुबईच्या धर्तीवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार असून देशातील अशा पध्दतीचे हे पहीले मत्स्यालय असणार आहे.. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मैदानात या मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. कंटेनर पध्दतीच्या या अभिनव मत्स्यालयात बोगद्याच्या आतून सागरी माशांचे विश्व अनुभवता येणार आहे.

प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरु झाले आहे. हे काम पुढील दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. या प्रकल्पामुळे अलिबागच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल.- प्रशांत नाईक, वीज व बांधकाम सभापती अलिबाग