अलिबाग – राज्‍यातील अनेक जिल्‍हा न्‍यायालयांमध्‍ये बॉम्‍ब ठेवल्‍याच्‍या धमकीचे मेल आल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी अलिबाग येथील जिल्‍हा न्‍यायालयातदेखील कसून तपासणी आली. परंतु तपासणीमध्‍ये काहीच संशयास्‍पद आढळून न आल्‍याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकारी आणि आठ सदस्यांचे बॉम्बशोधक पथक तत्काळ न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर श्वानपथकाच्या मदतीने न्यायालयातील प्रत्येक कक्षाची तपासणी करण्यात आली. तसेच वकील बार, विधी सेवा विभाग, न्यायालय परिसर आणि वाहनांचीही बारकाईने झडती घेण्यात आली. बॉम्‍बशोधक पथक न्‍यायालयात दाखल झाल्‍याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

या संपूर्ण तपासणीदरम्यान कुठेही बॉम्बसदृश्य किंवा वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे न्यायालय प्रशासनासह वकील आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तपासणीनंतर जिल्‍हा न्‍यायालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागे कोणाचा हेतू आहे, हा खोडसाळपणा आहे की यामागे काही गंभीर कारण आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. न्यायालयांना अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल पहिल्यांदाच प्राप्त झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तपासणीत काहीही आढळले नसले तरी खबरदारी म्हणून न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

राज्‍यातील विविध न्‍यायालयाना धमकीचे इमेल आल्‍यानंतर खबरदारी म्‍हणून आम्‍ही अलिबाग येथील जिल्‍हा न्‍यायालयाची तपासणी केली. यात संशयास्‍पद असे काहीही आढळून आले नाही. – संजय बांगर, बीडीडीएस पथक प्रमुख