अलिबाग – खोल समुद्रातील मासेमारीवरील ६१ दिवसांची बंदी १ ऑगस्टपासून संपली असली, तरी रायगड किनारपट्टीवरील मच्छीमारांनी अद्याप समुद्रात उतरण्याचे धाडस केलेले नाही. खवळलेला समुद्र, जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे मासेमारीसाठी परिस्थिती प्रतिकूल असल्याने अनेक नौका अजूनही किनाऱ्यावरच उभ्या आहेत. त्यामुळे बाजारात ताज्या समुद्री मासळीचा पुरवठा सुरू होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाने खोल समुद्रातील मासेमारीला परवानगी दिली असली, तरी राज्य सरकारने प्रादेशिक जलक्षेत्रातील मासेमारीवरील बंदी १५ ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी करता येणार नाही. त्यातच समुद्र अद्याप खवळलेला असल्याने खोल समुद्रातही जाणे धोकादायक ठरत आहे.
पावसाळ्यात सागरी माशांच्या प्रजननासाठी दरवर्षी मासेमारीवर बंदी घालण्यात येते. यामुळे मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होते. मात्र यंदा मॉन्सून उशिराने सक्रिय झाल्याने समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती अपेक्षेपेक्षा अधिक काळ कायम राहिली आहे. दरम्यान, रायगड किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेनंतरच पारंपरिक पद्धतीने नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात केली जाते. यंदा २८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा असल्याने अनेक मच्छीमार त्यानंतरच नियमित मासेमारी सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
ताज्या मासळीचा तुटवडा
गोदामात ठेवलेली जाळी कोळी बांधवांनी बाहेर काढली, त्यांची डागडुजी सुरू आहे मात्र अजूनही समुद्रात जाण्याचा धोका कुणी पत्करायला तयार नाही. बाजारात स्थानिक ताज्या समुद्री मासळीचा पुरवठा मर्यादित झाला आहे. काही ठिकाणी गोठवलेल्या मासळीवर ग्राहकांची गरज भागवली जात असली, तरी ताज्या मासळीची मागणी कायम आहे. त्यामुळे बंदीचा कालावधी संपूनही समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे ताज्या मासळीची आवक तातडीने वाढण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा मॉन्सून उशिराने सक्रिय झाला. त्यामुळे समुद्र अजूनही खवळलेलाच आहे. अशा परिस्थितीत मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आम्ही घाई न करता समुद्र शांत होण्याची वाट पाहत आहोत.– सत्यवान पेरेकर, मच्छीमार
