अलिबाग- कनेक्टींग लिंक वरील स्ट्रे पूलाचे विहंगम दृष्य पहाण्याच्या नादात एक कार दरील कोसळल्याची घटना खालापूर तालुक्यातील गारमाळ रस्त्यावर घडली. महामार्ग पोलीसांनी धाडसी बचावकार्य करून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
वाहन चालवतांना दाखवलेला अतिउत्साह आणि धाडस जिवावर बेतू शकते. याचाच अनुभव मोहीत भटनागर यांना आला. कनेक्टिंग लिंक वरील स्ट्रे ब्रीजचे विहंगम दृश्य पाहण्याच्या त्यांनी आपली गाडी कच्च्या रस्त्यावर नेली. मात्र याच वेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि कार थेट ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. चार ते पाच वेळा उलट सुलट होत कार एका झाडाला जाऊन अडकली. हा अपघात इतका भीषण होता, की अपघात बघणाऱ्यांनी चालक वाचण्याची आशा सोडली होती. मात्र, महामार्ग पोलिसांनी तातडीने राबविलेल्या धाडसी बचाव मोहिमेमुळे चालकाला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील आणि त्यांचे पोलीस पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. दरीत उतरणे धोकादायक असतानाही पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे आणि संतोष गुजरवार आणि गोडसे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरले. त्यांनी झाडाला आडव्या अडकून पडलेल्या कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. त्यानंतर त्यांला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
या अपघातात चालक मोहित स्वरूप भटनागर (वय ५१, रा. गुरुग्राम, हरियाणा) यांना किरकोळ जखमी झाले आहेत. काही क्षणांचा उशीर झाला असता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महामार्ग पोलिसांनी दाखविलेली प्रसंगावधानता, धाडस आणि तत्परता यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचवला. कनेक्टींग लिंकचा स्ट्रे ब्रिज बघण्याच्या नादात या मार्गावरील प्रवाश्यांनी आपले जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
