अलिबाग- अलिबाग आणि आसपासच्या परीसरात राहणाऱ्या अनेक ग्राहकांना वाढीव वीज देयके देण्यात आली आहेत. वीजेचा वापर दिडशे ते दोनशे युनीट असतांना, ग्राहकांना नऊशे ते हजार युनिट वापराची देयके पाठवण्यात आली आहे. पंधरा ते सोळा हजार रुपयांची देयके प्राप्त झाल्याने ग्राहकांची पायाखालची वाळूच सरकली आहे. तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यास सांगीतले जात आहे.

वेश्वी गोंधळपाडा येथे अश्वमेघ सोसायटीत राहणाऱ्या ग्राहकांना सप्टेंबर महिन्यातील वीज देयके नुकतीच प्राप्त झाली. ही वीज देयके बघून ग्राहक चक्रावून गेले. सोसायटी मधील बहुतेक ग्राहकांना १५ ते २० हजार रुपयांची देयके देण्यात आली आहेत. बंद असलेल्या घरांना आणि अत्यल्प वीज वापर असलेल्या ग्राहकांना ही वाढीव वीज देयके देण्यात आली आहेत. ही वीज देयके भरायची कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उत्पनापेक्षा जास्त वीज देयके येऊ लागल्याने, सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आले आहेत. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता. त्यांनी रिडींग उपलब्ध न झाल्याने सरासरी वीज देयके देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. हे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात आहे.

मीटर रिडींग उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून, वर्षभरात ज्यांनी कधीही दोनशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरली नाही त्यांना ९०० युनिटची वीज देयके सरासरी म्हणून देण्यात आली आहेत. मीटर रिडींग दाखवल्यावर वीज देयके कमी करून दिली जात आहेत. पण पुढील महिन्यात असे प्रकार टाळण्यासाठी स्मार्ट मीटर बसवा अन्यथा स्वतः मीटर रिडींग ऑनलाईन उपलब्ध करून द्या असा अगाऊपणाचा सल्ला महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे.

स्मार्ट मीटर वरून सध्या असंतोष निर्माण झाला आहे. ज्या ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले आहेत त्यांच्या वीज देयकांमध्ये भरमसाठ वाढ झाली असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर विरोधात असंतोष वाढीस लागला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला जातो आहे. अशा ग्राहकांना वाढीव देयके पाठवून बळजबरीने स्मार्ट मीटर बसविण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

वीज देयकांचे वितरण ठप्प…

ग्राहकांच्या वीज वापराचे रिडींग घेण्यासाठी आणि वीज देयकांचे वितरण करण्यासाठी खाजगी एजन्सी नेमल्या जात होत्या. स्मार्ट मीटरमुळे या एजन्सीकडील रिडींग घेण्याचे काम बंद झाले. त्यामुळे त्यांना केवळ वीज देयके वितरणाचे काम शिल्लक राहीले. त्यामुळे हे काम करणाऱ्या एजन्सीला काम करणे परवडेनासे झाले. त्यांनी वीज देयकांचे वितरणही बंद केले. त्यामुळे ग्राहकांना होणारे वीज देयकांचे वितरण ठप्प झाले आहे.

मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीने काम सोडल्याने, ग्राहकांना रिडींग उपलब्ध न झाल्याने, वाढीव वीज देयके प्राप्त झाली आहेत. ग्राहकांनी मीटर रिडींग आणल्यास त्यांना वीज देयके दुरुस्त करून दिली जाऊ शकतील. स्मार्ट मीटर बसविल्यास रिडींग उपलब्ध न होण्याचा प्रश्न निकाली निघेल. – आकाश तावडे, अति. कार्यकारी अभियंता महावितरण

आम्हाला महिन्याला सरासरी २५०० रुपये बील यायचं. या महिन्यात ९५०० रुपये बील आले आहे. आमच्या सोसायटीमध्ये २० सदनिका आहेत. यातील बहुतांश लोकांना १० ते १५ हजार रुपये बील आले आहे. महावितरण कंपनीच्या कार्यालयात विचारणा केली असता सरासरी बिल देण्यात आले आहे असे सांगण्यात आले. काही प्रमाणात बिल कामी करून दिले आणि स्मार्ट मीटर बसवा असे सांगितले. – तेजस गायकर, अध्यक्ष , अश्वमेध अपार्टमेंट