अलिबाग- वीज देयके थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने वीज देयके वसूली मोहीम सुरु केली आहे. वांरवार पाठपुरावा करूनही वीज देयके न भरणाऱ्या, ग्राहकांचा वीज पूरवठा खंडीत केला जात आहेत. मात्र या वसूली पथकांना ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. असेच एक प्रकरण अलिबाग शहरात समोर आले आहे. वीज वसूली करण्यासाठी गेलेल्या पथकाला मारहाण आणि शिवीगाळी केल्याची बाब मांडवी मोहल्ला परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारी नंतर आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कडून सध्या राज्यभरात थकीत वीज देयकांच्या वसूलीसाठी व्यापक मोहीम राबविली जात आहे. या मोहीमे अंतर्गत अलिबाग परिमंडळाचे बारा जणांचे एक पथक बुधवारी मांडवी मोहल्ला परिसरात गेले होते. अख्ततारी जैनुद्दीन चौधरी यांचे ६८ हजार २८० रुपयांचे बील बील थकले होते. या थकीत बिलाची वसूली करण्यासाठी पथक गेले असता,  मुसद्दीक जैनुद्दीक चौधरी यांनी आमच्याकडे पैसे नाहीत सांगून थकीत वीज देयक भरण्यास नकार दिला. पथकाने वीज देयक भरणार नसाल तर नियमानुसार कारवाईचा भाग म्हणून वीज पुरवठा खंडीत करावा लागेल असे सांगितले, या गोष्टीचा राग आल्याने, मुसद्दीक जैनुद्दीक चौधरी आणि अरफान मुनवर चौधरी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली, तसेच गलिच्छ शब्दात शिवागाळी केली.

महावितरणच्या अभियंता वैष्णवी दांडेकर यांनी दिलेल्या तक्रारी नुसार भारतीय न्याय संहितेतील विवीध कलमा अंतर्गत, लोकसेवक यांनी कर्तव्य बजावू नये या करता मारहाण आणि शिविगाळी केल्या प्रकरणी दोघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक भुंडेरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.