अलिबाग- उसर ते पोयनाड दरम्यान बैलखिंड मार्गे रस्ता गेली दोन दशकांहून अधिक काळ प्रस्तावित होता. मात्र या मार्गाच्या कामाला गती मिळू शकली नव्हती. आता उसर परिसरात उभारल्या जाणाऱ्या गेल कंपनीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या पॉलीमर प्रकल्पामुळे या मार्गाच्या कामाला गती मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यासाठी उसर ते पोयनाड हा मिसिंग लिंक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतला आहे.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या गेल कंपनीकडून उसर येथे पॉलीमर प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा पॉलीमर प्रकल्प असणार आहे. ज्यातून १ हजार मे. टन पॉलीमतरचे उत्पादन होणार आहे. आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. या शिवाय याच परिसरात शासकीय वैद्यकी महाविद्यालयाची उभारणी केली जात आहे. ५०० खाटांचे रुग्णालय सुरु होणार आहे. यामुळे या परिसरातील वाहनांची वर्दळ वाढणार आहे. हीबाब लक्षात घेऊन उसर ते पोयनाड दरम्यान प्रस्तावित असलेल्या आणि लालफीतीत अडकून पडलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पोयनाड ते उसर दरम्यान बैलखिंड मार्गे प्रत्सावित रस्त्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भुसंपादन आणि वनविभागाच्या परवानगीसाठी साडे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वनविभागाच्या मान्यततेनंतर लागलीच या मार्गाच्या कामाचे काम सुरू होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कनिष्ठ अभियंता साईश कांबळे यांनी दिली. या मार्गामुळे उसर ते पोयनाड हे पाऊण तासाचे अंतर अवघ्या दाह ते पंधरा मिनटांवर येणार आहे. गेल कंपनी प्रशासनानेही या मार्गासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे.

सध्या उसर येथून अलिबाग, कार्लेखिंड, पेझारी आणि पोयनाड असा प्रवास करावा लागतो. ज्यासाठी जवळपास ३० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते, पण उसर ते पोयनाड मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या १२ ते १५ किलोमीटर येणार आहे. वडखळवरून नागाव, चौलच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांनाही या मार्ग उपयुक्त ठरु शकणार आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचन होण्याची शक्यता आहे.