अलिबाग – रायगड जिल्हा परिषद शिक्षक बदली लाच प्रकरणातील आरोपी तथा जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक योगेशकुमार भस्मे यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची वाढ केली आहे. विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार यांनी केलेला युक्तिवाद आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेला रिमांड रिपोर्ट ग्राह्य धरून न्यायालयाने हा आदेश दिला.

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आरोपीकडून इतर सहभागी व्यक्तींबाबत माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. लाच मागणीच्या पडताळणीदरम्यान आरोपीने वरिष्ठ व्यक्तींचा उल्लेख केल्याने या व्यक्तींचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याचा तपास करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद ॲड. संतोष पवार यांनी केला.

तसेच शाळा बदलीच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपीकडून अशाच प्रकारे इतरांकडून लाच मागण्यात आली आहे का, याचीही चौकशी करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने सांगितले.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील माहिती, आवश्यक फॉरेन्सिक पुरावे तसेच इतर तपासाच्या अनुषंगाने चौकशी करायची असल्याने वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत योगेश भस्मे यांना आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.या वाढीव कोठडीदरम्यान तपासातून आणखी कोणाची नावे समोर येतात आणि या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने पुढे जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष यांची चौकशी होणार का?

भस्मे यांनी लाचेची मागणी करताना मोठ्या साहेबांना सांगून तुमची बदली रद्द करून देतो असे म्हटले होते. त्यामुळे भस्मे यांनी उल्लेख केलेले मोठे साहेब कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. भस्मे हे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा परिषद अध्यक्षांची चौकशी करणार का याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.