अलिबाग – रेवस रेड्डी सागरी मार्गाचा भाग असलेल्या, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरून २० टनांवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळाव पूल संरचनात्मकदृष्ट्या संवेदनशील असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याच्या बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा अंतिम टप्पा सुरू असून पुलावर अतिरिक्त भार पडू नये, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी २० टनांवरील जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

यापूर्वी पुलावरून १२ टनांवरील वाहनांना बंदी होती. मात्र सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मर्यादा २० टनांवरील वाहनांसाठी लागू करण्यात आली आहे.दरम्यान, पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत. वाहनांचा वेग ताशी ३० किलोमीटरपेक्षा अधिक नसावा, दोन वाहनांमध्ये किमान २० मीटरचे अंतर ठेवावे तसेच पुलावर कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

असे आहेत पर्यायी मार्ग

अलिबागकडून मुरूडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी अलिबाग–पोयनाड–वडखळ–नागोठणे–कोलाड–रोहा–तळेखार–साळाव, अलिबाग–पेझारी चेकपोस्ट–नागोठणे–कोलाड–रोहा–तळेखार–साळाव तसेच अलिबाग–बेलकडे–वावे–सुडकोली–रोहा–तळेखार–साळाव हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

तर मुरूडकडून अलिबागकडे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी साळाव–तळेखार–रोहा–कोलाड–नागोठणे–वडखळ–पोयनाड–अलिबाग, साळाव–तळेखार–रोहा–कोलाड–नागोठणे–पेझारी चेकपोस्ट–अलिबाग तसेच साळाव–तळेखार–रोहा–सुडकोली–वावे–बेलकडे–अलिबाग हे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अत्‍यावश्‍यक सेवांना सवलत

दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.रेवदंडा-साळाव पुलाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.