अलिबाग– महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्त्या करणाऱ्या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने १० वर्षांची सक्त मजूरीची शिक्षा सुनावली, आणि दंडही ठोठावला. राम नथु जाधव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सदर घटना ही ९ मार्च २०२१ रोजी रोहा तालुक्यातील वराठी आदिवासी वाडीवर घडली होती. मयत महिला आणि राम नथु जाधव हे दोघे पाच वर्षांपासून एकत्र राहत होते. मोलमजूरी करून दोघेही आपला चरितार्थ चालवत होते. राम जाधव हा सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद विवाद होत होते. याच कारणावरून त्याने महिलेला बांबूच्या काठीने आणि कोयत्याने मारहाण केली होती. ज्यात महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान दोघांचे भांडण सोडविण्यासाठी शेजारी राहणारी महिला तिथे गेली. मात्र आरोपी जाधव याने त्या महिलेला देखील बांबूने मारहाण केली. ज्यात ती जखमी जखमी झाली.

या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी या गुन्ह्याचा तपास करत होते. परिस्थिती जन्य पुरावे, शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक तपास करून सुर्यवंशी यांनी आरोपी राम नथु जाधव याच्या विरोधात माणगाव सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम के पाटील यांच्या न्यायालयासमोर झाली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून योगेश तेंडूलकर यांनी युक्तीवाद केला. सुनावणी दरम्यान तपासिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि राम जाधव याच्या मारहाणीत जखमी झालेली महिला यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर आणि सबळ पुराव्याच्या निश्चितीनंतर न्यायालयाने आरोपी राम जाधव याला हत्या आणि मारहाण प्रकरणात दोषी ठरवले. आरोपीला दहा वर्ष सक्त मजूरी आणि १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास एक महिनाचा अतिरीक्त साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालाकडे रोहा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.